ट्रेंट ब्रिज येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने वेस्ट इंडिजचा 241 धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांची मालिका आपल्या नावे केले आहे. इंग्लंड 2-0 ने पुढे आहे. शेवटचा सामना 26 जुलैपासून एजबॅस्टन येथे खेळवला जाणार आहे. इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या 416 धावांना प्रत्युत्तर देताना वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 41 धावांची आघाडी घेत 457 धावा केल्या. तर इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जो रूट आणि हॅरी ब्रूकने शानदार शतके झळकावली, त्यामुळे संघाचा डाव 425 धावां पर्यंत पोहचला आणि वेस्ट इंडिज संघाला विजयासाठी 385 धावांचे लक्ष्य देण्यात आले. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचे फलंदाज 20 वर्षीय युवा फिरकी गोलंदाज शोएब बशीरच्या फिरकीत अडकत राहिले आणि संपूर्ण संघ 143 धावांत आटोपला. अशाप्रकारे सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने 241 धावांनी विजय मिळवला.
टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाने ऑली पॉप (121) यांचे शानदार शतक, बेन डकेट (71) आणि बेन स्टोक्स (69) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पहिल्या डावात 416 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफने डावात सर्वाधिक तीन बळी घेतले. जेडेन सील्स, केविन सिंक्लेअर आणि केव्हम हॉज यांनी 2-2 विकेट घेतल्या. तर शामर जोसेफला 1 विकेट मिळाली.
इंग्लंडच्या पहिल्या डावातील 416 धावांना प्रत्युत्तर देताना वेस्ट इंडिजचा पहिला डाव 41 धावांच्या आघाडीसह 457 धावांवर संपला. कावेम हॉज (120) आणि अलिक अथनाजे (82) यांच्यात उत्कृष्ट भागीदारी पाहायला मिळाली. यानंतर जोशुआ दा सिल्वा (नाबाद 82) आणि शामर जोसेफ (33) यांनी अखेरच्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी करत वेस्ट इंडिजला आघाडी मिळवून दिली. या डावात इंग्लंडच्या ख्रिस वोक्सने 4 बळी घेतले. गॅस ॲटकिन्सन आणि शोएब बशीर यांना 2-2 विकेट्स मिळाले.
तिसऱ्या डावात 41 धावांनी पिछाडीवर असलेल्या इंग्लंड संघाकडून जो रुट(122) आणि हॅरी ब्रुक(109) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर 425 धावा केल्या. तर बेन डकेटने 76 धावांचे योगदान दिले. बाकीचे फलंदाज फ्लॉप ठरले. या डावात विंडीजच्या जेडेन सील्सने 4 तर अल्झारी जोसेफने 2 विकेट्स मिळावल्या.
इंग्लंडने दिलेल्या 385 धावांचा पाठलाग करताना क्रेग ब्रॅथवेट (47) आणि मायकेल लुईस (17) यांनी पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी करताना वेस्ट इंडिजच्या सलामीला चांगली सुरुवात केली, पण त्यानंतर डाव गडगडला. एकामागून एक विकेट्स पडत राहिल्या ज्यामुळे वेस्ट इंडिज संघ 143 धावांत ढेपाळला. इंग्लंडच्या शोएब बशीरने 5 विकेट्स घेतल्या. तर ख्रिस वोक्स, गॅस ॲटकिन्सन यांनी 2-2 बळी घेतले.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा नेपाळवर 9 विकेट्सनं शानदार विजय
कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावून रुटनं केली ‘या’ दिग्गज खेळाडूंची बरोबरी
श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाबद्दल आकाश चोप्रानं दिली प्रतिक्रिया