मुंबई । भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा क्रिकेटचा प्रत्येक सामना हा रोमांचकारी असतो. दोन्ही संघातील खेळाडू विजयासाठी जीव तोडून मेहनत घेतात. आज दोन्ही संघात एकही क्रिकेटची मालिका होत नाही पण एक वेळ अशी होती की भारत हा पाकिस्तानचा दौरा करायचा.
नुकतेच, पाकिस्तानचा माजी कर्णधार रशिद लतिफ याने १९९६ साली झालेल्या एका सामन्यातला किस्सा सांगितला. या सामन्यात राहुल द्रविड आऊट नसतानाही त्याला बाद देण्यात आले. लतीफने सामना संपल्यानंतर राहुल द्रविडला आऊट नसल्याचे सांगितले.
शारजा येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी २७२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. राहुल द्रवीड फलंदाजीसाठी मैदानावर आला होता तेव्हा त्याचा तो तिसरा वनडे सामना होता. राहुल तीन धावांवर खेळत असताना मुश्ताक अहमदच्या चेंडूवर लतीफने जोरदार आपील केले. आणि पंचानीही राहुल द्रविडला झेलबाद असल्याचा निर्णय दिला.
सामना संपल्यानंतर राहुलने लतीफला विचारले की, तो बाद होता का? त्यावर लतीफ म्हणाला, नाही भाऊ तू आउट नव्हता.
आमिर सोहेलच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने ३८ धावांनी भारतावर विजय मिळवला होता.
लतीफकडून द्रविडचे कौतुक
लतीफने द्रविडचे कौतुक करताना म्हणाला, अशा खेळाडूंचा केवळ क्रिकेट खेळण्यासाठी जन्म होतो. द्रविडने भारताच्या एकोणीस वर्षांखालील आणि भारत अ संघातील खेळाडूंना मार्गदर्शन करत चांगले खेळाडू तयार केले आहे. यापूर्वी पाकिस्तानचा माजी फलंदाज युनूस खाननेही द्रविडचे कौतुक केले होते. द्रविडच्या मार्गदर्शनामुळेच त्याच्या फलंदाजीत सुधारणा झाल्याचे युनिस खान सांगितले.