इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल २०२० ची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. सर्व संघ एकमेकांशी किमान एक सामना खेळले आहेत. आयपीएल गुणतालिकेमध्ये दिल्ली कॅपिटल्स १२ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर फक्त २ गुणांनी किंग्ज इलेव्हन पंजाब संघ शेवटच्या म्हणजे आठव्या स्थानावर आहे. यावर्षी चेन्नई सुपर किंग्ज संघाची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे. चेन्नई संघ सातव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर, पाहिला क्रमांक असणारा दिल्ली कॅपिटल्स आणि तिसरा क्रमांक असणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांनी आतापर्यंत एकदाही आयपीएल चषक जिंकलेला नाही, हे संघ मुंबई इंडियन्स संघाला स्पर्धा देत आहेत.
आयपीएलच्या १३ व्या हंगामात बरेच चढउतार पहायला मिळाले. जेथे अनेक दिग्गज आणि अनुभवी खेळाडू एकीकडे संघर्ष करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे बरेच नवीन चेहरे त्यांच्या कामगिरीने चमकत आहेत आणि सर्वांची मने जिंकत आहेत. या नव्या चेहर्यांमध्ये आणि युवा खेळाडूंमध्ये क्रिकेट तज्ज्ञ भारतीय क्रिकेटचे भविष्य पाहत आहेत. चला अशा पाच खेळाडूंवर नजर टाकू ज्यांनी आयपीएलच्या पहिल्या फेरीत आपली छाप सोडली आहे.
देवदत्त पडिक्कल
गेल्या वर्षीच्या आयपीएलच्या लिलावात २० वर्षीय देवदत्त पडिक्कलला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने २० लाख रुपयांना खरेदी केले होते. सलामीवीर देवदत्त पडिक्कल हादेखील मागील वर्षी आरसीबीचा भाग होता, पण त्यावेळी त्याला कोणताही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. कर्नाटक क्रिकेट संघाकडून खेळताना त्याने अनेक विजयी सामन्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. देशांतर्गत क्रिकेट सामन्यात त्याच्या शानदार कामगिरीनंतर यंदा आयपीएलमध्ये त्याला आरसीबीकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. पडिक्कलने या संधीचे चांगले सोने केले. पडिक्कलने आतापर्यंत ७ सामन्यांमध्ये ३४.७१ च्या सरासरीने २४३ धावा केल्या आहेत. यावेळी त्याने ३ अर्धशतके ठोकली आहेत. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत २५ चौकार आणि ५ षटकार लगावले आहेत.
टी नटराजन
तमिळनाडूचा २९ वर्षीय खेळाडू थांगरसु म्हणजेच टी नटराजनला २०१७ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने ३ कोटींच्या किंमतीत संघात घेतले. २०१७ मध्ये पंजाबकडून खेळत त्याने ६ सामन्यांत ९.०७ च्या इकोनॉमी रेटने २ बळी घेतले. सन २०१६ मध्ये चॅम्पियन ठरलेला सनरायझर्स हैदराबाद संघात त्याला ५० लाखांमध्ये विकत घेतले. परंतु त्याला २०१८ आणि २०१९ मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. आता २०२० मध्ये तो हैदराबादच्या संघाचा महत्वाचा खेळाडू आहे आणि त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. या हंगामात नटराजनने ८ सामन्यांत ९ विकेट्स घेतल्या आहेत.
रवी बिश्नोई
रवी बिश्नोई आयपीएल २०२० मधील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा भाग आहे. बिश्नोईच्या गोलंदाजीत विविधता आहे आणि तो आपल्या कलेच्या जोरावर या स्पर्धेत मोठ्या खेळाडूंसमोर अडचणी निर्माण करताना दिसतो. आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषकात सर्वाधिक १७ बळी घेणारा फिरकीपटू पंजाबने आयपीएल २०२० च्या लिलावात दोन कोटी रुपयांना विकत घेतला. १९ वर्षांखालील विश्वचषकानंतर बिश्नोईही या मोठ्या लीगमध्ये छाप पाडत आहे. आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यात त्याने ७.८५ च्या इकोनॉमी रेटने ८ विकेट्स घेतल्या आहेत. बिश्नोईने आतापर्यंत डेविड वॉर्नर, जॉनी बेयरस्टो आणि अब्दुल समद या दिग्गजांना आपल्या गोलंदाजीवर नाचवले आहे.
कमलेश नागरकोटी
कोलकाता नाईट रायडर्सचा युवा गोलंदाज कमलेश नागरकोटीने अखेर आयपीएल २०२० मध्ये पदार्पण केले. नागरकोटी हा २०१८ साली आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकणार्या भारतीय संघाचा एक भाग होता. विश्वचषक स्पर्धेदरम्यान त्याच्या गोलंदाजीचे सौरव गांगुलीने कौतुकही केले होते. यानंतर, २०१८ आयपीएलच्या लिलावात केकेआरने त्याला ३.२० कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. दुखापतीमुळे तो २०१९ च्या आयपीएलमध्ये भाग घेऊ शकला नाही. परंतु केकेआरने त्याच्यावर विश्वास ठेवला. कमलेश आता केकेआरचा महत्वाचा खेळाडू आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ६ सामन्यात त्याने ९.५२ च्या इकोनॉमी रेटने ४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या गोलंदाजीने दिग्गजांची मने जिंकली आहेत.
प्रियम गर्ग
आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२० चा कर्णधार प्रियम गर्गला सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२० च्या लिलावात १.९ कोटी रुपयांना खरेदी केले. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. आता आयपीएल २०२० मध्ये त्याला हैदराबाद संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. आतापर्यंत ७ सामन्यात २१.५० च्या सरासरीने त्याने ५६ धावा केल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. यावेळी त्याने ८ चौकार आणि २ षटकार लगावले आहेत. प्रियमच्या जास्त धावा नसल्या, तरी त्याच्या फलंदाजीच्या शैलीचे कौतुक केले जात आहे. यासह त्याने सीएसकेसारख्या दिग्गज संघासमोर आयपीएलचे पहिले अर्धशतक ठोकले आहे. त्याने सीएसके विरुद्ध २६ चेंडूत नाबाद ५१ धावा फटकावल्या आणि आपल्या संघाला सन्माननीय धावसंख्या मिळवून दिली.
ट्रेंडिंग लेख-
-२०१० प्रमाणेच चेन्नई यंदाही होणार चॅम्पियन? नक्की काय आहेत कारणे
-मराठी मनाचा अभिमान.! नाव ‘तांबे’ पण खेळाडू मात्र सोन्यासारखा
-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १७ – क्रिकेटचा गंभीर शिलेदार
महत्त्वाच्या बातम्या-
-“१०० मीटरपेक्षा लांब षटकार ठोकल्यास द्याव्या अतिरिक्त धावा” – केएल राहुल
-दिल्लीला दुखापतींनी घेरले; रिषभ पंत पाठोपाठ आता खुद्द कर्णधारावरच आले संकट
–Video: आयपीएलमध्ये ‘बिहू’ डान्सची क्रेझ; शॉला शुन्यावर बोल्ड केल्यावर आर्चरचे थिरकले पाय