श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने क्रिकेटच्या मैदानावर आणखी एक मोठा विक्रम केला आहे. लॉर्ड्स येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत शतके झळकावून रूटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 50वे शतक पूर्ण केले. यामुळे जो रुटचा 50 किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय शतके ठोकणाऱ्या नऊ फलंदाजांच्या प्रतिष्ठित यादीत सामील झाला आहे.
सध्या कसोटी क्रिकेटमधील फॅब फोरमध्ये विराट कोहली, जो रूट, स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यमसन यांचा समावेश आहे. सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये जो रूटच्या नावावर सर्वाधिक शतके आहेत. रूटने 34 कसोटी शतके झळकावली आहेत. तर केन विल्यमसनने 32, स्टीव्ह स्मिथने 32 आणि विराट कोहलीने 29 कसोटी शतके झळकावली आहेत.
जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांबद्दल बोलायचे झाले, तर तोच जो रूट या यादीत 9व्या क्रमांकावर पोहोचला आहे. रुटने लॉर्ड्सच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत शतके झळकावली. यां कामगिरीसह तो 50 आंतरराष्ट्रीय शतकांचा जादुई आकडा पार केला. कसोटी क्रिकेटमध्ये शतकांच्या बाबतीत जो रूट विराट कोहलीच्या पुढे असेल. पण या विक्रमाबाबतीत तो विराटच्या जवळपासही नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 50 शतके ठोकण्याचा विश्वविक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटने 348 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. विराटसोबतच दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलानेही याच डावात 50 आंतरराष्ट्रीय शतकांचा आकडा गाठला होता. सचिन तेंडुलकरने 376 डावांमध्ये आणि रिकी पॉन्टिंगने 418 डावांमध्ये या जादुई आकडा पार केला. रूटला ही कामगिरी करण्यासाठी एकूण 455 डाव लागले. या पाच व्यतिरिक्त कुमार संगकारा, ब्रायन लारा, जॅक कॅलिस, महेला जयवर्धने यांची नावे 50 किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आहेत.
आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत केवळ पाच फलंदाज रूटच्या पुढे आहेत. आपले 34 वे कसोटी शतक झळकावून रूटने माहेला जयवर्धने, सुनील गावस्कर, ब्रायन लारा आणि युनूस खान यांची बरोबरी केली. आता त्याच्या पुढे फक्त राहुल द्रविड, कुमार संगकारा, रिकी पाँटिंग, जॅक कॅलिस आणि सचिन तेंडुलकर आहेत.
हेही वाचा-
रोहितची नेतृत्वशैली, धोनी-कोहलीपेक्षा वेगळी; दिग्गज क्रिकेटपटूचा खुलासा
बांगलादेश मालिकेपूर्वी भारताला मोठा झटका, स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर
उर्वरित आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ‘हे’ 3 रेकाॅर्ड्स मोडणे कोहलीसाठी अशक्य