सनरायझर्स हैदराबादचा संघ आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी करत आहे. कर्णधार पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली 5 सामन्यांपैकी त्यांनी 3 सामने जिंकले आहेत. तर 2 सामन्यांत त्यांचा पराभव झाला आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात हैदराबादने पंजाबवर अवघ्या 2 धावांनी विजय मिळवला. आयपीएल इतिहासात हैदराबादने पहिल्यांदाच एवढ्या कमी धावांनी सामना जिंकला आहे. हा सामना संपल्यानंतर पॅट कमिन्सनं आपल्या टीमची कामगिरी आणि इम्पॅक्ट खेळाडूविषयी प्रतिक्रिया दिली.
सामना संपल्यानंतर कर्णधार पॅट कमिन्सनं सांगितलं की, “हा सामना अतिशय चांगला झाला. पंजाब संघाने गोलंदाजीत चांगली कामगिरी केली. त्यातही आमच्या फलंदाजांनी उत्तम खेळी करत 182 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर आमच्या गोलंदाजांनी त्यांना धावांचा पाठलाग करण्यापासून रोखलं. जर तुम्ही 150-160 धावा केल्या तर तुम्ही दहा सामन्यांपैकी नऊ सामन्यांत पराभूत होऊ शकता. आम्ही आमच्या धावसंख्येवर आनंदी होतो.”
पॅट कमिन्सनं युवा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी याच्याबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “मागील आठवड्यात त्याचं पदार्पण चांगलं राहिलं. त्यानं फलंदाज आणि क्षेत्ररक्षणही उत्तम केलं. तसेच 3 षटकं गोलंदाजीही केली. संघानं 183 धावापर्यंत मजल मारण्यात नितीशची भूमिका महत्त्वाची होती.” पंजाब किंग्जविरुद्ध नितीश कुमार रेड्डीनं 37 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीनं 64 धावांची खेळी केली. तसेच गोलंदाजीत 3 षटक टाकले आणि 1 विकेटही घेतली. या चांगल्या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
सनरायझर्स हैदराबादनं प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट्स गमावत 182 धावांची मजल मारली. यामध्ये नितीश कुमार रेड्डी (64 धावा), अब्दुल समद (25 धावा) यांचे योगदान महत्त्वाचे राहिले. प्रत्युत्तरात, पंजाबनं 6 विकेट्स गमावून 180 धावाच केल्या. त्यामध्ये शशांक सिंग(46 धावा), आशुतोष शर्मा(33 धावा), या दोघांच्या व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला 30 धावांच्यावर जाता आले नाही. अशाप्रकारे हैदराबादनं हा सामना 2 धावांनी जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या
रोमहर्षक सामन्यात हैदराबादचा पंजाबवर 2 धावांनी विजय
हार्दिक पांड्याला टी20 विश्वचषकात जागा मिळणार नाही? माजी मुख्य निवडकर्त्यानं केलं मोठं विधान
चाहत्यांसाठी वाईट बातमी, अनेक विदेशी खेळाडू आयपीएलच्या मध्यावरच सोडतील संघाची साथ