चेम्सफोर्ड | बुधवारी (२५ जुलै) कौंटी क्रिकेट मैदानावर भारत वि. एसेक्स यांच्यात तीन दिवसीय सराव सामना सुरु झाला आहे.
या सामन्यात भारतीय संघाचा डाव सावरण्यात यष्टीरक्षक दिनेश कार्तिक आणि कर्णधार विराट कोहलीला यश आले आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला होता.
हा निर्णय कर्णधार कोहलीला चांगलाच महागात पडला. डावाच्या पहिल्या तीन षटकातच एसेक्सच्या मॅट कोल्सने सलामीवीर शिखर धवन ० धावा आणि चेतेश्वर पुजाराला १ धावेवर वर बाद करत भारताला जोरदार धक्के दिले.
त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या रहाणेलाही पिचवर जास्त वेळ तग धरता आला नाही. रहाणे अवघ्या सतरा धावा करत बाद झाला.
या सामन्यात पाचव्या स्थानी फलंदाजीस आलेल्या कर्णधार कोहलीने मुरली विजयच्या साथीने भारताची पडझड रोखली.
सलामीला आलेल्या विजयने ५३ धावा करत एका बाजूने भारताचा डाव लावून धरला होता.
तर कोहलीने ६८ धावा करत भारताला चांगल्या स्थीतीत पोहचवले.
कोहली बाद झाल्यानंतर फलंदाजीस आलेल्या केएल राहुलने ५८ धावांची खेळी करत, आपण पहिल्या कसोटी सामन्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले.
तर नियमित यष्टीरक्षक वृद्धीमान सहाच्या जागी संधी मिळालेल्या दिनेश कार्तिकने नाबाद ८२ धावांची खेळी करत पहिल्या कसोटीसाठी संघातील आपले स्थान पक्के केले आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ८४ षटकात ६ बाद ३२२ धावा केल्या होत्या.
यावेळी दिनेश कार्तिक नाबाद ८२ आणि हार्दिक पंड्या नाबाद ३३ धावा करत खेळत आहेत.
एसेक्सकडून मॅट कोल्सने आणि पॉल वाल्टरने प्रत्येकी दोन बळी घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-युवा खेळाडू पवन शहाने हा विक्रम करत गंभीर, पुजारालाही टाकले मागे
-केवळ काही तासांच्या फरकाने भारतीय संघ खेळणार दोन वनडे सामने