---Advertisement---

IND VS NZ; कसोटी मालिकेपूर्वी टीम साऊदीचा कर्णधारपदाचा राजीनामा

tim southee
---Advertisement---

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी आणि श्रीलंकेविरुद्ध क्लीन स्वीप झाल्यानंतर टीम साऊदीने न्यूझीलंडच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. न्यूझीलंड संघाला श्रीलंकेत 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 असा पराभव पत्करावा लागला होता. याशिवाय टीम साऊदीच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी चांगली नव्हती. याच कारणामुळे त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. टीम साऊदीने संघाच्या हितासाठी कसोटी कर्णधारपद सोडत असल्याचे म्हटले आहे. अशा परिस्थितीत सलामीवीर टॉम लॅथम 16 ऑक्टोबरपासून भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडचे नेतृत्व करताना दिसणार आहे. 

टॉम लॅथमने याआधी संघाचे नेतृत्व केले असून तो कारकिर्दीत दुसऱ्यांदा संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. 2020 ते 2022 पर्यंत तो संघाचा कर्णधार होता. त्याने 9 सामन्यात कर्णधारपद केले आहे. कर्णधारपद सोडताना टीम साऊदीने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, “अशा खास फॉरमॅटमध्ये ब्लॅककॅप्सचे (न्यूझीलंड क्रिकेट संघ) कर्णधारपद भूषवणे ही माझ्यासाठी सन्मानाची आणि बहुमानाची गोष्ट आहे. मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीत नेहमीच संघाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला असून हा निर्णय संघासाठी सर्वोत्तम आहे. असे मला वाटते. तसेच मैदानावरील माझ्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करणे आणि माझे सर्वोत्तम देण्यासाठी मी नेहमी कटीबद्ध राहीन”.

35 वर्षीय टीम साऊदीने 14 कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. 2022 मध्ये केन विल्यमसनने त्याच्याकडे कर्णधारपद सोपवले. साऊदीच्या नेतृत्वाखाली किवी संघाने केवळ 6 सामने जिंकले तर दोन सामने अनिर्णित राखण्यात यश आले. न्यूझीलंडने उर्वरित सामने गमावले. या दरम्यान साऊदीची वैयक्तिक कामगिरीही निराशाजनक राहिली. टीम साऊदीला 14 सामन्यांत केवळ 35 विकेट मिळाल्या. श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांत त्याला केवळ दोन विकेट घेता आल्या.

भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी टीम साऊदी त्या संघाचा भाग असेल असे स्पष्ट केले आहे. टॉम लॅथम कर्णधार होणार असल्याचेही त्याने सांगितले आहे. स्टीडने टीम साऊथीचे कौतुक करताना म्हटले आहे की, “तुम्हाला आवडत असलेली एखादी गोष्ट सोडणे कधीही सोपे नसते, परंतु साऊदी हा खरा संघाचा माणूस आहे आणि त्याने संघाचे सर्वोत्तम हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.”

हेही वाचा-

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का; बाबर आझमने कर्णधारपद सोडले
भारताच्या खतरनाक विजयानंतर बांगलादेश प्रशिक्षक म्हणाले, “अशी आक्रमक वृत्ती…”
भारतासाठी सर्वाधिक कसोटी विजय मिळवणारे टाॅप-5 कर्णधार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---