भारतीय क्रिकेट संघातील रिषभ पंत हे एक मोठे नाव आहे. एक युवा व स्फोटक फलंदाज तसेच एक चतुर यष्टीरक्षक म्हणून पंत आपले संघातील स्थान पक्के करत आहे. कोणत्याही क्षणी सामना फिरवुन देण्याची क्षमता पंतमध्ये आहे. परंतू याच पंतच्या निवडीवरुन एकेवेळी मोठे वादंग निर्माण झाले होते. त्याला संघात स्थान दिल्यानंतर लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केली होती. याचा खुलासा तेव्हाचे निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी केला आहे.
रिषभ पंतला संधी देण्यावरून केला खुलासा
एमएसके प्रसाद यांनी सांगितले की, ‘ज्यावेळी आम्ही पंतला कसोटी संघात संधी दिली तेव्हा लोक बोलले होते की तो कसोटी सामन्यात फलंदाजी करू शकत नाही आणि अवघड खेळपट्टीवर यष्टीरक्षण देखील करू शकत नाही. आज पाहिले तर पंतने इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर यष्टीमागे जबरदस्त कामगिरी केली. तसेच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध कौतुकास्पद फलंदाजी केली.’
निवडीवर उभे केले जात होते प्रश्न
या माजी निवडकर्त्यांनी सांगितले की, ‘ बऱ्याच लोकांना असे वाटत नव्हते की पंत कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करेल. आम्ही परदेशात पंतला खेळवण्याचा निर्णय घेतला, कारण त्या ठिकाणी यष्टीरक्षण करणे अवघड असते तसेच फलंदाजी करणे देखील महत्वाचे असते.’
पंतने स्वतः ला सिद्ध केले
प्रसाद यांनी सांगितले की, ‘पंतने परदेशात शानदार फलंदाजी करीत स्वतः ला सिद्ध केले आहे. त्याने यावर्षीच्या सुरवातीला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध शानदार कामगिरी करीत भारताला कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. पंत आता न्युझीलंड विरुद्ध 18 ते 22 जून दरम्यान पहिल्या विश्वकसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्यात खेळताना दिसेल.’
निवडसमितीला घ्यावे लागले होते अनेक कठोर निर्णय
एमएसके यांनी सांगितले की, ‘निवडकर्ता म्हणून तुमची सर्वात पहिली जबाबदारी असते की तुम्ही संघाच्या भविष्याचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे. काही वेळेला तुम्हाला दिग्गज खेळाडूंविरुद्ध देखील निर्णय घ्यावा लागतो, मात्र अशावेळी आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे, आणि जो निर्णय संघाच्या भविष्यकरता उचित ठरेल तो निर्णय घेतला पाहिजे.’