आयपीएल २०२२ (IPL 2022) लवकरच सुरु होणार आहे. चाहत्यांच्या मनात आयपीएलविषयी उत्सुकता निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये प्रेक्षकांना रोमांचक सामने पाहायला मिळतील. कारण, यावेळी ८ नाही तर १० संघ स्पर्धेत उतरणार आहेत. या स्पर्धेचे आयोजन कोठे करायचे? हा बीसीसीआयसमोर सर्वात मोठा प्रश्न आहे. याबाबतीत बरीच चर्चा सुरु आहे. कारण, कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेकडून बीसीसीआयला मोठी ऑफर आली आहे.
बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल यांच्यामध्ये सध्या आयपीएल २०२२ कोठे आयोजित करावी यावरुन चर्चा सुरु आहे. आयपीएल भारतामध्ये घ्यावी अस मत जास्तीतजास्त जणांचे आहे. युएईमध्ये ही आयोजित केली जाऊ शकते. भारताकडे अजून एक पर्याय आहे तो म्हणजे दक्षिण आफ्रिका. नुकताच भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जावून आला तेव्हा कोणत्याही बायो बबलशिवाय भारताने तेथे एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळल्या. या संदर्भात दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे सचिव ग्रॅमी स्मिथ यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाहांचे आभार मानले आहेत.
एका क्रिकेट संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, बीसीसीआय आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये फ्रॅंचायझींचा खर्च कमी करता येईल अशा ठिकाणांवर चर्चा सुरु आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने हे आश्वासन दिले आहे की, युएईच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेत हाॅटेल स्वस्त असतील. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने बीसीसीआयसमोर बायो बबलसह जोहान्सबर्ग आणि आसपासच्या चार ठिकाणी सामन्याच्या आयोजनाचा प्रस्ताव ठेवला आहे. ती ४ ठिकाणे अनुक्रमे जोहान्सबर्ग, सेंच्युरियन, बेनोनी व पोचेस्ट्रोम अशी आहेत. ही चारही स्टेडियम एकमेकांपासुन जवळ अंतरावर आहेत.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने असा प्रस्ताव मांडला आहे की, आयपीएल २०२२ चा एक भाग केपटाऊनमधील न्यूलँड्स स्टेडियम आणि जवळच्या पार्ल मैदानावर खेळवला जाऊ शकतो. यापूर्वी २००९ मध्ये, क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने आठ ठिकाणी आयपीएलचे आयोजन केले होते.
बीसीसीआयचे सचिन जय शाह यांनी अशी माहिती दिली की, आयपीएल २०२२ मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार असून यावेळी १० संघ ट्रॉफीसाठी लढताना दिसणार आहेत. ही स्पर्धा मे महिन्याच्या शेवटी संपेल. क्रिकेट चाहत्यांना दोन महिने सतत झटपट क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे. याआधी १२ आणि १३ फेब्रुवारीला मेगा लिलाव होणार आहे, ज्यामध्ये सर्व फ्रँचायझी त्यांचे संघ तयार करतील. आयपीएल २०२२ मध्ये एकूण ७४ सामने खेळले जाणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघातील ३ न्यू कमर्स, ज्यांना मिळू शकते वनडे पदार्पण करण्याची संधी (mahasports.in)