नवी दिल्ली – भारताचे पुर्व खेळाडू आणि महान फलंदाज सुनिल गावसकर यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन संघातील निवडक खेळाडूंना घेत, अकरा जणांचा एक संघ जाहीर केला आहे. यावेळी त्यांनी असेही म्हटले की, ‘कदाचित या खेळाडूंची कामगिरी आकड्यांच्या बाबतीत चांगली नसेल. मात्र, त्यांच्या स्वप्नवत संघात हेच खेळाडू आहेत.’
सोनी टेन या वाहिनीवरील एका कार्यक्रमात पाकिस्तान संघाचे पुर्व कर्णधार रमीज राजा यांच्यासोबत सुनिल गावसकर यांची खास बातचीत झाली. त्यावेळी त्यांनी आपल्या या निवडक खेळाडूंच्या संघाबद्दल सांगितले. ‘जर हे खेळाडू एकत्र क्रिकेट खेळणार असतील, तर ड्रेसिंग रुमचे वातावरण हे नक्कीच आनंददायी असेल. याचे कारण यातील सर्व खेळाडू हे प्रतिभावान तर आहेच. मात्र, ते प्रचंड मस्तीखोर देखील आहेत’
गावसकरांच्या संघात अनेक आश्चर्यकारक नावांचा समावेश…
सुनिल गावसकर यांनी आपल्या संघात सलामीला फलंदाज म्हणून भारताचा दिग्गज सलामी फलंदाज विरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तानचा विक्रमी फलंदाज हनीफ मोहम्मद यांचा समावेश केला आहे. हनिफ मोहम्मद याला ‘ओरिजनल लीटल मास्टर’ असे संबोधले जाते.
क्रिकेट्या देवाचाही संघात समावेश…
सुनिल गावसकर यांनी आपल्या ‘ड्रीम अकरा’ सदस्यीय संघात क्रमांक ३ वर फलंदाज म्हणून पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटर जहीर अब्बास याला निवडले आहे. तर क्रमांक 4 वर भारताचा महान फलंदाज मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा समावेश केला आहे. पुर्व भारतीय खेळाडू गुंडाप्पा विश्वनाथ यांना गावसकर यांनी क्रमांक 5 वर पसंती दिली आहे.
पाकिस्तानचे महान गोलंदाज आणि सध्याचे पंतप्रधान इमरान खान हेही गावसकरांच्या संघात…
सुनिल गावसकर यांनी निवडलेल्या या संघात अष्टपैलु खेळाडू म्हणून त्यांनी भारताच्या 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार कपील देव यांची निवड केली आहे. कपील देव हे या संघात क्रमांक 6 वर असतील. तसेच क्रमांक 7 वर सध्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान परंतु पाकिस्तान संघाने ज्यांच्या नेतृत्वात विश्वचषकाला गवसणी घातली, त्या इमरान खान यांचा समावेश केला आहे.
यष्टीरक्षक म्हणून संघात आश्चर्यकारक नाव…
सुनिल गावसकर यांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये यष्टीरक्षक म्हणून एक आश्चर्यकारक नाव समाविष्ट केले आहे. आपल्या या संघात गावसकर सैय्यद किरमानी याला यष्टी मागी उभे असलेले पाहु इच्छितात.
दोन्ही देशातील दिग्गज गोलंदाजांचा संघात समावेश…
सुनिल गावसकर यांनी अकरा जणांच्या संघात दोन्ही देशातील अनेक दिग्गज गोलंदाजांचा समावेश केला आहे. यात पाकिस्तानचे माजी खेळाडू वसीम अकरम, अब्दुल कादीर तर भारताचे बी. एस. चंद्रशेखर यांच्या नावांचा समावेश आहे.
सुनील गावस्कर यांनी भारत आणि पाकिस्तान संघातील खेळाडूंचा मिळून बनवलेला संयुक्त संघ खालीलप्रमाणे ;
हनीफ मोहम्मद, विरेंद्र सेहवाग, जहीर अब्बास, सचिन तेंडुलकर, गुंडप्पा विश्वनाथ, कपिल देव, इमरान खान, सय्यद किरमानी, वसीम अकरम, अब्दुल कादिर आणि बी. एस. चंद्रशेखर.