क्रीडाजगतात ऑलम्पिकनंतर सर्वाधिक मानाची स्पर्धा समजल्या जाणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धां पुढील वर्षी इंग्लंड येथील बर्मिंघम शहरात होणार आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेत क्रिकेटचे सामने देखील खेळवले जाणार आहेत. आता या स्पर्धेच्या अधिकृत कार्यक्रमाची घोषणा झाली आहे. त्यानुसार क्रिकेटचे सर्व सामने एकूण आठ दिवस खेळले जातील.
‘या’ ठिकाणी रंगणार क्रिकेटचा थरार
आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा इंग्लंडमधील बर्मिंगहॅम या ठिकाणी खेळण्याचे नियोजित आहे. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये १९९८ क्वाललंपूर राष्ट्रकुलनंतर प्रथमच क्रिकेटचा समावेश केला गेला आहे. यावेळी केवळ महिला क्रिकेटचे सामने खेळले जातील. एजबॅस्टन येथील रोज बाऊल मैदानावर हे सामने २९ जुलै ते ७ ऑगस्ट असे आठ दिवस खेळवले जाणार आहेत. सर्व सामने टी२० स्वरूपाचे असतील. गट फेरीतील सामने चार ऑगस्टपर्यंत खेळले जातील. उपांत्य फेरीतील सामने ६ ऑगस्ट तर, तिसऱ्या क्रमांकासाठीचा व अंतिम सामना ७ ऑगस्ट रोजी रंगेल.
राष्ट्रकुल स्पर्धेच्या अधिकृत संकेतस्थळावर मिळालेल्या माहितीनुसार, जलतरण व डायव्हिंग स्पर्धा अकरा दिवस, क्रिकेट आणि जिम्नॅस्टिक आठ, मॅरेथॉन व ऍथलेटिक्स स्पर्धा सात दिवस खेळल्या जातील. एकूण १९ विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा या राष्ट्रकुल दरम्यान होणार आहेत.
असे असणार प्रारूप
या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी एकूण आठ संघ पात्र ठरतील. त्या संघांना दोन गटात विभागले जाईल. यजमान इंग्लंड आपोआप स्पर्धेसाठी पात्र ठरेल. तर, एक एप्रिल २०२२ पर्यंत टी२० क्रमवारीत अव्वल सातमध्ये असणाऱ्या संघांना स्पर्धेसाठी संधी देण्यात येईल. यापूर्वी, १९९८ मध्ये क्वाललंपूर येथे खेळल्या गेलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश होता. पुरुष गटातील या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने सुवर्णपदक, ऑस्ट्रेलियाने रौप्य पदक तर न्यूझीलंडने कांस्य पदक पटकावले होते.
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा, विराट कर्णधार तर…
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ‘हे’ विक्रम आहेत फक्त भारतीय संघाच्याच नावावर
WTC Final: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ साऊथम्पटनमध्ये दाखल