क्रिकेट विश्वचषक ही जगात सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे. क्रिकेट विश्वचषकात खेळणाऱ्या प्रत्येक संघाला आणि त्या संघाच्या देशातील नागरिकांना आपल्या संघाने जिंकावे असे वाटत असते. जो संघ विश्वचषक जिंकतो त्या संघाला आणि त्या संघातील खेळाडूंना नेहमीच लक्षात ठेवले जाते. तसेच त्यांना पुढे कित्येकवर्षे सन्मानही होत रहातो. त्याचबरोबर विश्वविजेत्या संघांना मिळणाऱ्या बक्षीस रक्कमेचीही मोठी चर्चा होत रहाते.
वरिष्ठ भारतीय पुरुष संघाने आत्तापर्यंत वनडेतील २ विश्वचषक जिंकले आहेत. पहिल्यांदा भारताने १९८३ ला कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली हा विश्वचषक जिंकला तर दुसरा विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय संघाला २८ वर्षांची वाट पहावी लागली. भारताने २०११ ला एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला.
या दोन्ही विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूंना मिळालेल्या बक्षीस रक्कमेत मोठा फरक आहे. खंरतर १९८३ चा विश्वचषक भारतीय संघाने जिंकल्यानंतर खऱ्या अर्थाने भारतात क्रिकेटला प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात झाली होती.
१९८३ पर्यंत झालेले पहिले तीनही विश्वचषक स्पर्धा या इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. या तीन विश्वचषकांपैकी पहिले २ विश्वचषक क्लाईव्ह लॉईडच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज संघाने जिंकले होते.
त्यानंतर २५ जून १९८३ ला झालेला विश्वचषक भारताने वेस्ट इंडिजला पराभूत करत जिंकला.
त्यावेळी विश्वचषकासाठी ६६,२०० पाऊंड्स एवढी बक्षीस रक्कम होती. ही प्रायोजकत्वच्या अंदाजे १३.५ टक्के रक्कम बक्षीस होती. त्यावेळी या विश्वचषकासाठी प्रुडेन्शिअल अॅश्युरन्स कंपनीने ५००००० पाऊंंड्स प्रायोजक म्हणून दिले होते. त्यातील विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला २०,००० पाऊंड्स बक्षीस म्हणून मिळाले होते.
तसेच वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी एकदा केलेल्या ट्विटनुसार १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाला विश्वचषकानंतर १५०० रुपये सामना शुल्क म्हणून मिळत होते. तसेच २०० रुपये इतका दैनंदिन भत्ता मिळत होता. त्याचबरोबर संघातील कर्णधार, उपकर्णधार, संघ व्यवस्थापक असा सर्वांना समान भत्ता मिळत होता. सरदेसाई यांनी ट्विट केलेल्या सामना शुल्क आणि दैनंदीन भत्त्याच्या डॉक्यूमेंटची तारिख २१ सप्टेंबर १९८३ अशी आहे.
यानंतर क्रिकेटमध्ये मोठी प्रगती होत गेली. भारताने जेव्हा २०११ ला विश्वचषक जिंकला त्यावेळी भारतीय संघाला १.९ मिलियन पाऊंड्स एवढी बक्षीस रक्कम मिळाली होती.
आयसीसीने प्रत्येक विश्वचषकानंतर बक्षीसाच्या रक्कमेत वाढ केली आहे.
आत्तापर्यंत विश्वविजेत्या संघांना मिळालेली बक्षीस रक्कम आणि स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम –
१९७५ – वेस्ट इंडिज – ४००० पाऊंड्स (९,००० पाऊंड्स – स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम)
१९७९ – वेस्ट इंडिज – १०००० पाऊंड्स (२५,९०० पाऊंड्स – स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम)
१९८३ – भारत – २०००० पाऊंड्स (६६,२०० पाऊंड्स – स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम)
१९८७ – ऑस्ट्रेलिया – ३०००० पाऊंड्स (९९,३०० पाऊंड्स – स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम)
१९९२ – पाकिस्तान – २०,५०० पाऊंड्स (११८,००० पाऊंंड्स – स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम)
१९९६ – श्रीलंका – ३०,००० पाऊंड्स (२००,००० पाऊंड्स – स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम)
१९९९ – ऑस्ट्रेलिया – १८०,००० पाऊंड्स (६००००० पाऊंड्स – स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम)
२००३ – ऑस्ट्रेलिया – १.२ मिलियन पाऊंड्स ( ३ मिलियन पाऊंड्स – स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम)
२००७ – ऑस्ट्रेलिया – १.४ मिलियन पाऊंड्स ( ३ मिलियन पाऊंड्स – स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम)
२०११ – भारत – १.९ मिलियन पाऊंड्स ( ६ मिलियन पाऊंड्स – स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम)
२०१५ – ऑस्ट्रेलिया – ३.७५ मिलियन अमेरिकन डॉलर्स (१० मिलियन अमेरिकन डॉलर्स – स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम)
२०१९ – इंग्लंड – ४ मिलियन अमेरिकन डाॅलर (१० मिलियन अमेरिकन डॉलर्स – स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम)
ट्रेंडिंग घडामोडी –
टीम इंडियाचे ५ शिलेदार व त्यांच्या आवडत्या बाॅलीवूड अभिनेत्री
क्रिकेट विश्वविजेत्या भारताच्या ट्राॅफी नक्की आहेत तरी कुठं?
४३ वर्षांपुर्वी २० युरोंसाठी तो मैदानात गेला थेट नग्न अवस्थेत