मुंबई | जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या 19 वर्षाखालील संघात निवड झालेल्या 17 वर्षीय यशस्वी जयस्वालने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची नुकतीच भेट घेतली.
पाणापुरीचा गाडा ते 19 वर्षाखालील भारतीय संघाचा सदस्य हा यशस्वीचा प्रवास प्रेरणादायी आहे.
अर्जून तेंडूलकरचा संघ सहकारी अललेल्या यशस्वीचा हा खडतर प्रवास समजल्यानंतर सचिनने अर्जून तेंडुलकर जवळ यशस्वीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.
यशस्वीने सचिनला भेटल्यानंतर पत्रकारांशी बोलताना या विशेष भेटीबद्दलची माहिती दिली.
“मला काही दिवसांपूर्वी अर्जूनने सांगितले होते की बाबांना तुला भेटायचे आहे. तू स्वत: घरी जाऊन त्यांना भेट.” असे यशस्वीने सांगितले.
या भेटीत यशस्वीने सचिनकडून फंलदाजीबद्दल मोलाचे सल्ले घेतले.
“फलंदाजी करताना फलंदाजीचा आनंद घे. सामन्याच्या निकालाचा विचार करु नकोस. त्यामुळे तुझ्यावर दडपण येणार नाही.” असे सचिनने सांगितल्याचे यशस्वी म्हणाला.
त्यानंतर यशस्वी गेल्या काही दिवसांपासून कव्हर ड्राइव्ह मारताना सातत्याने बाद होतोय. कव्हर ड्राइव्ह कसा चांगला खेळावा या यशस्वीच्या प्रश्नावरही सचिनने मार्गदर्शन केले.
“फिरकी गोलंदाजां विरुद्ध खेळताना फटके खालून खेळण्याचा प्रयत्न कर आणि वेगवान गोलंदाजांचा सामना करताना पुढचा पाय स्ट्रेच करुन बचावात्मक फटका खेळ. त्याचबरोबर नेटमध्ये कव्हर ड्राइव्हचा सराव करणे सर्वात महत्वाचे आहे.” यशस्वीच्या कव्हर ड्राइव्हच्या प्रश्नांवर सचिनने अशाप्रकारे मार्गदर्शन केले.
तसेच यशस्वीला सचिनने स्वाक्षरी केलेली बॅटही भेट दिली.
वयाच्या 11 व्या वर्षी क्रिकेटर बनण्याचे स्वप्न घेऊन यशस्वी एकटा उत्तर प्रदेशमधील भदोहीहून मुंबईत आला.
त्याने मुंबईमध्ये आझाद मैदानावरील मुस्लिम युनायटेड क्लबमध्ये कित्येक दिवस उपाशी पोटी काढले मात्र त्याने आपली जिद्द सोडली नाही.
त्याच्या घरची परिस्थिती हालाकीची असूनही वडील त्याला पैसे पाठवायचे मात्र तेवढे पैसे त्याला पुरत नव्हते. त्यासाठी त्याला पाणीपुरीचा गाडाही चालवावा लागला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–हार्दिक पंड्याचा भिमपराक्रम, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय
-बापरे! सलग ६ टी२० मालिकांमध्ये टीम इंडियाला कुणी पराभूतच करु शकले नाही