क्रीडाविश्वातून आनंदाची बातमी येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा बापमाणूस बनला आहे. योगायोग म्हणजे, आजच्याच दिवशी अर्थातच 5 ऑक्टोबर रोजी रहाणेच्या मुलीचाही जन्म झाला होता. त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव आर्या ठेवले आहे. आता 3 वर्षांनंतर रहाणेच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलला आहे. बुधवारी (दि. 5 ऑक्टोबर) अजिंक्यची पत्नी राधिका धोपवकर हिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे.
रहाणेने सोशल मीडियावरून दिली आनंदाची माहिती
कसोटीवीर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने ट्वीट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटले की, “आज सकाळी राधिका आणि मी या जगात आपल्या बाळाचे स्वागत केले. राधिका आणि बाळ दोघेही पूर्णपणे ठीक आहेत. आम्ही तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादासाठी धन्यवाद देऊ इच्छितो.”
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) October 5, 2022
रहाणेच्या या पोस्टवर चाहत्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत अनेकजण प्रतिक्रिया देत क्रिकेटपटूला शुभेच्छा देत आहेत. समालोचक आकाश चोप्रा याने कमेंट करत लिहिले की, “तुम्हा दोघांचेही अभिनंदन, आणि चिमुकल्याला खूप खूप प्रेम.” याव्यतिरिक्त अभिनेता विक्रांत मेस्सी याने लिहिले की, “अभिनंदन जिंक्स.” एका चाहतीनेही कमेंट करत लिहिले की, “तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे खूप खूप अभिनंदन.”
अजिंक्य आणि राधिकाचे लग्न
अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपवकर (Radhika Dhopavkar) यांचे लग्न 26 सप्टेंबर, 2014 रोजी झाले होते. त्यांनी मराठमोळ्या पद्धतीने संसार थाटला होता. विशेष म्हणजे, दोघेही बालपणीचे मित्र आहेत. त्यांना लग्नाच्या 5 वर्षांनंतर एक मुलगी झाली, जिचे नाव त्यांनी आर्या असे ठेवले होते. आर्याचा जन्म 5 ऑक्टोबर, 2019 रोजी झाला होता. आता त्यांचा मुलगाही 5 ऑक्टोबर रोजी झाला आहे.
रहाणेच्या क्रिकेट कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर तो सध्या अनेक चढ-उतारांचा सामना करत आहे. कसोटी संघातून तो बाहेर पडला आहे. तसेच, तो देशांतर्गत क्रिकेटमध्येही धावा करण्यात अपयशी ठरत आहे. अशात त्याच्या कारकीर्दीतील हा वाईट काळ आहे. कारण, काही काळापूर्वीच त्याने कसोटी संघाचे उपकर्णधारपद भूषवले होते. त्याने नेतृत्व करतानाही अनेक सामने भारताला जिंकून दिले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता कोण उचलणार टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजी फळीची जबाबदारी? तीन नावांपैकी दिग्गजाने एकालाच निवडले
मैदानापासून दूर असतानाही बेअरस्टोने नावे केला मानाचा पुरस्कार; हे खेळाडूही बनले मानकरी