भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या एका वक्तव्यावर अवमानकारक टिप्पणी करणं भारताचा युवा क्रिकेटपटू अंगक्रिश रघुवंशी याला भारी पडलं आहे. ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्यानंतर त्यानं आपली चूक मान्य करत माफी मागितली.
अलीकडेच एका पॉडकास्टदरम्यान सायना नेहवाल क्रिकेट आणि इतर खेळांबद्दल बोलली होती. या पॉडकास्टची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पॉडकास्टमध्ये तिनं इतर खेळांना क्रिकेटपेक्षा शारीरिकदृष्ट्या कठीण असल्याचं म्हटलं होतं. यावर अंगक्रिश रघुवंशी यानं टिप्पणी केली.
सायना नेहवालचं हे वक्तव्य रघुवंशीला आवडलं नाही आणि त्यानं सायनाच्या विधानाची खिल्ली उडवली. त्यानं सायनाला भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या ताशी 150 किमी वेगानं येणाऱ्या बाऊन्सरचा सामना करण्याचा सल्ला दिला. मात्र काही तासांनंतर रघुवंशी याला त्याची चूक लक्षात आली आणि त्यानं ‘X’ या सोशल मीडिया हँडलवरून आपली पोस्ट डिलीट केली. रघुवंशीनं माफी मागत ही टिप्पणी म्हणजे केवळ विनोद असल्याचं सांगितलं.
सायना नेहवाल पॉडकास्टमध्ये म्हणाली होती की, “आज लोकांना माहित आहे सायना काय करत आहे, विनेश काय करत आहे, मीराबाई चानू काय करत आहे, नीरज काय करत आहे, कारण आम्ही सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. लोक आम्हाला ओळखतात म्हणून आम्ही चर्चेत आलो. मी जे काही केलं ते मला स्वप्नासारखे वाटतं. क्रीडा संस्कृती नसलेल्या भारतात राहून मी ते केलं.”
सायना पुढे म्हणाली, “कधीकधी क्रिकेटकडे इतकं लक्ष दिलं जातं याचं आम्हाला वाईट वाटतं. क्रिकेटबद्दल माझं मत आहे की, जर तुम्ही बॅडमिंटन, बास्केटबॉल, टेनिस आणि इतर खेळांकडे पाहिले तर ते शारीरिकदृष्ट्या जास्त कठीण आहेत. तुमच्याकडे शटल उचलून सर्व्ह करायलाही वेळ नाही. तुम्हाला शटल उचलून 20 सेकंदात सर्व्ह करावी लागते. या दरम्यान तुम्ही जोरदार श्वास घेता. मात्र क्रिकेटसारख्या खेळाकडे जास्त लक्ष वेधलं जातं जेथे मला वैयक्तिकरित्या वाटतं कौशल्य अधिक महत्त्वाचं आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
एकदा-दोनदा नव्हे, पाकिस्तानात अनेकवेळा झाला आहे भारतीय खेळाडूंवर हल्ला
अशक्य! क्रिकेट जगतातील हे 5 विश्वविक्रम मोडणे जवळपास कोणत्याही खेळाडूच्या अवाक्याच्या बाहेरच
5 स्टार भारतीय खेळाडू, जे 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकू शकतात