इंग्लंड संघ सध्या कसोटी संघासाठीच्या आपल्या नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. अशात इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्यासाठी सज्ज झाला आहे. मागील काही दिवसांपूर्वी जो रूटने आपल्या कसोटी कर्णधाराचा राजीनामा दिला होता. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे नवीन संचालक रॉब की यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर स्टोक्सने यावर सहमती दर्शवली आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्ड (England Cricket Board) लवकरच आपल्या नवीन कसोटी कर्णधाराची घोषणा करू शकते. अशात बेन स्टोक्सनेही (Ben Stokes) आपली प्राथमिकता सांगितली आहे. त्याला २ अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) आणि स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) यांना पुन्हा संघात घ्यायचे आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही खेळाडूंना ऍशेस मालिकेत खेळण्याची संधी खूपच कमी मिळाली आहे. यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी दोघांनाही संघातून बाहेर बसवले होते. इंग्लंड संघाला ऍशेस मालिकेत सपाटून पराभवाचा सामना करावा लागला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
माध्यमांतील वृत्तानुसार, बेन स्टोक्स इंग्लंडच्या नवीन कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. याव्यतिरिक्त कसोटी संघाचे नवीन प्रशिक्षक म्हणून गॅरी कर्स्टन आणि सायमन कॅटिच हे सर्वात पुढे आहेत. कर्स्टन यांनीच भारतीय संघाला त्यांच्या प्रशिक्षणात २०११चा विश्वविजेता बनवण्यात मोलाचा वाटा उचलला होता. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारासाठीच्या प्रशिक्षकांसाठी वेगवेगळे आवेदन काढले आहे. असे असले, तरीही स्टोक्सने कसोटीत कधीही नेतृत्व केले नाहीये. रूटच्या नेतृत्वात अधिकवेळ तो उपकर्णधार म्हणूनच खेळला आहे.
पाकिस्तानविरुद्ध मिळाला विजय
मागील वर्षी पाकिस्तानविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत खेळताना बेन स्टोक्सला इंग्लंड संघाचा कर्णधार बनवले होते. त्यावेळी संघाचे अधिकतर खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे खेळण्यासाठी फिट नव्हते. त्यावेळी संघाने मालिका ३-०ने खिशात घातली होती. त्याने २०२०मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एका कसोटी सामन्यातही कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती. इंग्लंडला या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, त्याने जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांच्यासोबत गोलंदाजी करत आपला ठसा उमटवला होता.
जूनपर्यंत फिट होण्याची शक्यता
कर्णधारपदाची जबाबदारी पेलण्यासाठी सज्ज असलेला स्टोक्स अजूनही गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. तो जूनमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी फिट होण्याची शक्यता आहे. असे असले, तरीही ईसीबी आणि बेन स्टोक्ससाठी सर्वात मोठे आव्हान हे नवीन उपकर्णधार नेमण्याचे आहे. जसे की, झॅक क्रॉलीने वेस्ट इंडिजमध्ये आपल्या नेतृत्वाने सर्वांना चकित केले होते. मात्र, उपकर्णधार बनण्यापूर्वी त्याला फलंदाज म्हणून स्वत:ला सिद्ध करावे लागेल. दुसरीकडे, वरिष्ठ खेळाडू म्हणून सर्वाधिक जबाबदारी ही जो रूटवर असेल.
बेन स्टोक्सच्या कसोटी कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत ७९ सामने खेळले आहेत. यात त्याने १४६ डावात खेळताना ३५.८९च्या सरासरीने ५०६१ धावा चोपल्या आहेत. यामध्ये ११ शतके आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट फलंदाजीत फेल, पण फिल्डिंगमध्ये तेज! बोल्टचा कॅच घेताना दाखवली चित्त्यासारखी चपळाई
‘तीन-चार फ्रँचायझी खोटे बोलल्या, त्यांनी धोका दिला’, हर्षल पटेलचा मोठा खुलासा