एखादी घटना आयुष्य बदलवणारी असू शकते, अनेकदा त्यातून एखाद्याला मोठे यश मिळण्याचीही प्रेरणा मिळते, असेच घडले आहे ते म्हणजे हर्षल पटेल याच्या बाबतीत. गेल्या दोन हंगामात हर्षल पटेलने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून दमदार कामगिरी केली आहे. मात्र, त्याच्या आयुष्यात २०१८ आयपीएल लिलावादरम्यान अशी घटना घडली, ज्यामुळे त्याची मानसिकता पूर्णपणे बदलली.
हर्षल पटेलने (Harshal Patel) २०१२ पासून आयपीएल खेळण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून त्याने २०१७ पर्यंत ३६ सामने खेळले होते आणि केवळ ३४ विकेट्स घेतल्या होत्या. या काळात तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी खेळला होता. पण, त्यानंतर त्याला बेंगलोरने मुक्त केले होते आणि तो २०१८ साठी आयपीएल लिलावात (IPL 2018 Auction) उतरला होता. त्यावेळी त्याच्याशी तीन-चार आयपीएल फ्रँचायझींनी संपर्क साधला होता, पण वास्तविक त्यातील कोणी लिलावात त्याच्यासाठी बोली लावली नव्हती. अखेर दिल्ली डेअरडेविल्सने (आताचा दिल्ली कॅपिटल्स) त्याला २० लाखांच्या किंमतीत खरेदी केले. याबद्दल हर्षल पटेलनेच खुलासा केला आहे.
ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन या शोमध्ये गौरव कपूरबरोबर बोलताना हर्षल पटेलने सांगितले की, ‘उपहासात्मक गोष्ट अशी की, वेगवेगळ्या फ्रँचायझींच तीन चार लोकांनी सांगितले होते, की ते माझ्यासाठी बोली लावतील. पण कोणीच बोली लावली नाही. त्यावेळी मला विश्वासघात झाल्यासारखे वाटले. त्यांनी माझ्याशी खोटे बोलले, त्यांनी धोका दिला.’
हर्षल पुढे म्हणाला, ‘यातून बाहेर यायला थोडा वेळ लागला. कारण मला खूप वाईट वाटले होते.’ हर्षल २०१८ ते २०२० दिल्ली संघाकडून खेळला. त्यानंतर त्याला पुन्हा बेंगलोर संघाने आपल्या संघात घेतले. यावेळी मात्र, त्याने दमदार कामगिरी करत २०२१ आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅप जिंकली. २०२२ आयपीएलमध्येही त्याने ८ सामन्यांत १० विकेट्स घेतल्या आहेत. त्याला २०२२ आयपीएल लिलावात बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) १०.७५ कोटी रुपयांची बोली लावून संघात घेतले होते.
तो म्हणाला, ‘आता, मला वाटत नाही की, मी असा माणूस आहे, ज्याला आयुष्यात १०.७५ कोटी रुपयांची गरज आहे. मला अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये रस नाही. पण, मी २०१८ च्या लिलावानंतर निश्चय केला होता की, मला महत्त्वाचा खेळाडू बनायचे आहे. म्हणजे जेव्हाही संघ निवड होईल, तेव्हा माझे नाव त्यात अपेक्षितच असेल.’
हर्षल सध्या बेंगलोरकडून खेळत असून त्याने आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
रियान परागचा फलंदाजीतच नाही, तर फिल्डिंगमध्येही जलवा; कॅलिस, गिलख्रिस्टच्या पंक्तीत स्थान
आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा बाद होणारा बेंगलोर दुसरा संघ, पहिल्या क्रमांकावर ‘या’ संघाचे नाव
Video: आधी भांडण, मग हँडशेकसाठी नकार; रियान पराग-हर्षल पटेल यांच्यात भर मैदानात राडा