भारत आणि श्रीलंका संघात दुसरा आणि अंतिम कसोटी सामना बंगळुरू येथे खेळला जात आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंका संघाचा पहिला डाव १०९ धावांवर संपुष्टात आला. ८६ धावांवर ६ विकेट्स या धावसंख्येपासून पुढे खेळताना श्रीलंका संघाला आपले ४ विकेट्स गमावत फक्त २३ धावाच जोडता आल्या. भारतीय संघाने पहिल्या डावाच्या आधारावर १४३ धावांची आघाडी घेतली. यादरम्यान भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी केली. त्याने १० षटकात अवघ्या २४ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. बुमराहने भारतात पहिल्यांदाच कसोटीत ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. त्याने कसोटीच्या एका डावात ८व्यांदा ५ विकेट्स घेतल्या आहेत.
या डावात बुमराहव्यतिरिक्त आर अश्विन आणि मोहम्मद शमी यांनीही प्रत्येकी २ विकेट्स आपल्या नावावर केल्या. श्रीलंकेविरुद्ध कोणत्याही भारतीय गोलंदाजाने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. बुमराहने ५ विकेट्सपैकी ३ विकेट्स या सामन्याच्या पहिल्या दिवशी घेतल्या होत्या, तर उर्वरित २ विकेट्स घेत त्याने श्रीलंका संघाचा पहिला डाव स्वस्तात संपवण्यात मोलाचे योगदान दिले. यापूर्वी इशांत शर्माने २०१५ साली कोलंबो येथील कसोटीत ५४ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, वेंकटेश प्रसाद यांनी २००१ साली कँडी कसोटीत ७२ धावा देत ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. झहीर खानही इतक्याच धावा देऊन श्रीलंकेविरुद्ध ५ विकेट्स घेतल्या आहेत.
जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेतही कसोटीच्या एका डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. यापूर्वी बुमराहने २८ कसोटीत ११५ विकेट्स घेतल्या आहेत. १९९० साली चंदीगडमध्ये ८२ धावांवर संपुष्टात आल्यानंतर, १०९ ही धावसंख्या भारताविरुद्धची दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे.
भारताने पहिल्या डावात ठोकल्या २५२ धावा
यापूर्वी भारतीय संघ पहिल्या दिवशी २५२ धावांवर संपुष्टात आला होता. भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक ९२ धावांची खेळी केली होती. त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाला अर्धशतक ठोकता आले नाही. श्रीलंकेसाठी लसिथ एंबुलदेनिया आणि प्रवीण जयाविक्रमाने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या होत्या, तरर धनंजय डिसिल्वानेही २ विकेट्स चटकावल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी दर्शकांकडून ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे जोरदार स्वागत, पण तो आला तसाच गेला; पाहा काय झालं?
‘नॅशनल क्रश’ स्म्रीती मंधना करतेय ‘या’ गायकाला डेट? त्यानेही हातावर गोंदलय ‘एसएम१८’
दुसऱ्या कसोटीत विराटने केले असे काही की, चाहत्यांनी दिले त्याच्या अन् डिविलियर्सच्या नावाचे नारे






