इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिका 2023चा पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना बर्मिंघमच्या एजबॅस्टन येथील मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंड संघाचा दिग्गज फलंदाज जो रूट कसोटीत पहिल्यांदाच यष्टीचीत बाद झाला. मात्र, असे असूनही त्याने खास पराक्रम गाजवला आहे. त्याने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गजांनाही मागे टाकले. चला तर त्याच्या विक्रमाविषयी जाणून घेऊयात…
जो रूट कसोटीत पहिल्यांदाच यष्टीचीत
इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट (Joe Root) याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या डावात यष्टीचीत बाद झाला. कसोटी क्रिकेट कारकीर्दीत यष्टीचीत बाद होण्याची रूटची ही पहिलीच वेळ होती. खरं तर, रूटच्या नावावर 11168 धावांची नोंद आहे. रूट कसोटीत पहिल्यांदा यष्टीचीत बाद होण्यापूर्वी 11168 धावा करत दुसऱ्या स्थानी पोहोचला. कसोटीत पहिल्यांदा यष्टीचीत बाद होण्यापूर्वी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये वेस्ट इंडिजचा दिग्गज माजी फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल अव्वलस्थानी आहे. चंद्रपॉल कसोटीत जेव्हा पहिल्यांदा यष्टीचीत बाद झाला होता, तेव्हा त्याच्या नावावर 11414 धावांची नोंद झाली होती.
सचिन-विराटला पछाडले
या यादीत तिसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज ग्रीम स्मिथ आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा यष्टीचीत बाद होण्यापूर्वी 8800 धावा केल्या होत्या. तसेच, विराट कोहली (Virat Kohli) यादीत चौथ्या स्थानी असून त्याने कसोटीत पहिल्यांदा यष्टीचीत बाद होण्यापूर्वी 8195 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे, कसोटीत सर्वाधिक 15921 धावा करणारा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) या यादीत पाचव्या स्थानी आहे. सचिनने कसोटीत पहिल्यांदा यष्टीचीत बाद होण्यापूर्वी 7419 धावा केल्या होत्या.
नेथन लायन पहिलाच गोलंदाज
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू नेथन लायन (Nathan Lyon) याने जो रूटला ऍलेक्स कॅरे याच्या हातून यष्टीचीत बाद केले. अशाप्रकारे लायन हा कसोटीत रूटला यष्टीचीत बाद करणारा पहिलाच गोलंदाज ठरला. त्याच्यापूर्वी कुठल्याच गोलंदाजाने रूटला कसोटीत यष्टीचीत बाद केले नव्हते. सामन्यातील रूटच्या खेळीविषयी बोलायचं झालं, तर पहिल्या डावात नाबाद 118 धावा केल्या होत्या. मात्र, दुसऱ्या डावात त्याला हा फॉर्म कायम ठेवता आला नाही. तो 46 धावाच करू शकला. (cricketer joe root first stump out in test format nathan lyon aus vs eng ashes)
महत्वाच्या बातम्या-
जोडी जबरदस्त! एकाच सामन्यात अँडरसन अन् ब्रॉडने रचला इतिहास, अनिल कुंबळेचा विक्रमही उद्ध्वस्त
MPL 2023: नाशिक टायटन्सच्या विजयाची हॅट्रिक! शतकासह चार बळी घेत अर्शिनची अष्टपैलू कामगिरी