भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज केएल राहुल आयसीसी टी२० विश्वचषकात सलामीवीराची भूमिका साकारत आहे. दरम्यान राहुलने देशासाठी विश्वचषक जिंकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राहुलला विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग बनायचे असून त्याला इतिहास रचायचा आहे. यासाठी त्याला भारताच्या २०११ विश्वचषक विजयाने त्याला प्रेरित केले आहे.
विशेष म्हणजे, राहुलच्या कारकिर्दीतील हा दुसरा विश्वचषक आहे. यापूर्वी त्याने २०१९ च्या विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या स्पर्धेत भारतीय संघाला पराभूत करत न्यूझीलंडने स्पर्धेबाहेर केले होते. दुसरीकडे, सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात भारतीय संघाचा प्रवास खडतर असल्याचे दिसत आहे.
आयसीसीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत राहुलने भारतीय संघासोबत इतिहास रचण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या व्हिडिओत तो म्हणतो की, “मोठे होताना मी घरी २०११ विश्वचषक पाहिला, तेव्हा आपण विश्वचषक जिंकला आणि माझ्यासाठी गोष्टी बदलल्या. त्या दिवशीपासून मी असा होतो की, हेच मला करायचे आहे. मला माझ्या देशासाठी विश्वचषक जिंकायचा आहे. एक, दोन किंवा तीन जितके शक्य आहेत, तितके जिंकू. विश्वचषकाचा भाग होऊ आणि इतिहास रचू.”
https://www.instagram.com/reel/CV4LJJIltri/?utm_source=ig_web_copy_link
स्कॉटलंडविरुद्ध मोठा विजय
भारतीय संघाने शुक्रवारी (०५ नोव्हेंबर) स्कॉटलंडविरुद्धच्या साामन्यात धडाकेबाज विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने स्कॉटलंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंड संघाचा डाव १७.४ षटकात ८५ धावांवर संपुष्टात आला होता.
हे आव्हान भारतीय संघाने अवघ्या ६.३ षटकात २ विकेट्स गमावत पार केले. यादरम्यान भारताकडून फलंदाजी करताना सलामीवीर केएल राहुलने अवघ्या १९ चेंडूत ५० धावा कुटल्या. यामध्ये ३ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. राहुलव्यतिरिक्त रोहित शर्माने १६ चेंडूत ३० धावा केल्या. या धावा करताना त्याने १ षटकार आणि ५ चौकार ठोकले.
भारतीय संघ सध्या ४ सामन्यांपैकी २ सामन्यात विजय, तर २ सामन्यात पराभूत होत, गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघाचा नेट रनरेट +१.६१९ इतका आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुजीबसाठी भारतीयांनी देव ठेवले पाण्यात; ट्विटरवर होतोय ट्रेंड
-भारताचा ‘हा’ खेळाडू म्हणतोय, “विराट बुर्ज खलिफा, तर धोनी बुर्ज अल अरब”
-‘बुमराह असावा भारताचा पुढील कर्णधार’; ‘हे’ कारण देत दिग्गजाने वाढवली यादी






