भारतीय संघाने रविवारी (दि. 08 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया संघावर 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयात विराट कोहली आणि केएल राहुल यांचा सिंहाचा वाटा राहिला. राहुलला सामन्यातील विस्फोटक खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र, हा सामना झाल्यानंतर राहुलने मनातील खंत व्यक्त केली. त्याने मान्य केले की, सततच्या टीका त्याच्यासाठी वेदनादायी होत्या. तो हैराण होता की, त्याने तितके खराब प्रदर्शन केले नव्हते.
काय म्हणाला राहुल?
केएल राहुल (KL Rahul) म्हणाला की, “खूप टीका होत होती, लोक प्रत्येक सामना आणि स्थितीत माझ्या प्रदर्शनावर भाष्य करत होते. मला कळत नव्हते की, असे का होत होते. कारण माझे प्रदर्शन तितके खराब नव्हते. हे खूपच वेदनादायी होते.” तो पुढे म्हणाला, “मला दुखापतीतून जाण्याच्या वेदना आणि पुनरागमनाची प्रक्रिया माहिती आहे. मला आयपीएलदरम्यान दुखापत झाली होती. जेव्हा मला समजले की, मला 4-5 महिन्यांचे नुकसान होईल आणि विश्वचषकाचा भाग बनण्याची खात्री नाहीये, तेव्हा तो खूपच कठीण काळ होता.”
पुनरागमनाबद्दल विश्वास
पुनरागमनाविषयी बोलताना 31 वर्षीय राहुल पुढे म्हणाला, “माझ्या डोक्यात गोष्टी आधीपासूनच होत्या आणि मला पुनरागमनाची प्रक्रिया माहिती होती. मी खूपच सकारात्मक राहिलो आणि विश्वचषकापूर्वी पुनरागमन करण्यासाठी माझी एकच प्रेरणा होती की, मला या विश्वचषकाचा भाग बनायचे आहे. हीच गोष्ट लक्षात ठेवत मी तयारी सुरू केली आणि दररोज सकाळी लवकर उठायचो, तेव्हा हाच विचार करायचो की, आम्हाला फक्त विश्वचषक जिंकायचा आहे. हीच माझी प्रेरणा होती. घरच्या मैदानावर विश्वचषक खेळणे सर्व क्रिकेटपटूंचे स्वप्न असते आणि हे सर्वांसाठी विशेष असते. मी यासाठी खूपच उत्साहित आहे.”
राहुलचे प्रदर्शन
यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने विश्वचषकात भारताच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना 115 चेंडूत नाबाद 97 धावांची शानदार खेळी साकारली. त्याच्या या खेळीत 2 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. त्याने षटकार खेचत संघाला 6 विकेट्सने विजय मिळवून दिला. त्याने या सामन्यात विराट कोहलीसोबत 165 धावांची भागीदारी रचली होती. विराट कोहली यानेही सामन्यात 116 चेंडूंचा सामना करताना 85 धावांची खेळी साकारली होती. यामध्ये 6 चौकारांचा समावेश होता. (cricketer kl rahul said that he did not understand why people were criticising his performace too much)
हेही वाचा-
भारताला धक्का! पाकिस्तानविरुद्ध भिडण्यापूर्वी शुबमनच्या तब्येतीविषयी समोर आली मोठी माहिती, लगेच वाचा
CWC 23 सामना सातवा: बांगलादेशने जिंकला टॉस, धरमशालेत बटलरसेना करणार बॅटिंग; दोन्ही संघात महत्त्वाचा बदल