भारतीय संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेत दणदणीत सुरुवात केली. भारताने ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने पराभूत केले. सामन्यानंतर अनेक क्रिकेट जाणकारांनी सांगितले की, विराट कोहली याचा झेल सोडणे सामन्याला कलाटणी देणारा क्षण होता. मात्र, रवींद्र जडेजा याचे मत वेगळे आहे. जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट काय होता, हे सांगितले आहे.
काय म्हणाला जडेजा?
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्या मते, स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याची विकेट सामन्याचा टर्निंग पॉईंट (Match Turning Point) होता. खरं तर, जसप्रीत बुमराह याने भारतीय संघाला शानदार सुरुवात करून देत मिचेल मार्श याला शून्यावर तंबूचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर कुलदीप यादव याने आपल्याच गोलंदाजीवर डेविड वॉर्नर याला 41 धावांवर झेलबाद केले.
जडेजाने घेतली स्मिथची विकेट
ऑस्ट्रेलिया संघ 2 विकेट्स गमावत 110 धावांवर खेळत होता. स्टीव्ह स्मिथ 46 धावा करत अर्धशतकाच्या जवळ होता. त्याच वेळी जडेजाने स्मिथचा त्रिफळा उडवत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. यानंतर जडेजाने लॅब्युशेन आणि ऍलेक्स कॅरे याची विकेट घेत ऑस्ट्रेलिया संघाला दबावात टाकले.
सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना जडेजाने म्हटले की, त्याला चेन्नईतील परिस्थिती माहिती आहेत. कारण तो इथे 10 वर्षांहून अधिक काळ खेळत आहे. 34 वर्षीय जडेजाने संघासाठी योगदान दिल्याबद्दल आनंदही व्यक्त केला.
तो म्हणाला, “माझ्या मते स्टीव्ह स्मिथ याचे बाद होणे सामन्याचा टर्निंग पॉईंट होता. जेव्हा तुम्ही स्टीव्ह स्मिथ यासारख्या फलंदाजांना बाद करता, तेव्हा नवीन फलंदाज येताच क्रीझवर टिकणे आणि स्ट्राईक बदलणे सोपे होत नाही. त्यामुळे स्टीव्ह स्मिथ याची विकेट माझ्या मते, सामन्याचा टर्निंग पॉईंट होता.”
“चेन्नईची खेळपट्टी मला आवडते. येथील स्थिती मला माहिती आहे. मी इथे 10-11 वर्षांपासून खेळत आहे. त्यामुळे मला येथील खेळपट्टीविषयी माहिती आहे. मी माझ्या गोलंदाजीचा आनंद घेतला आणि संघासाठी जे काही योगदान दिले, त्याने खूपच खुश आहे,” असेही त्याने पुढे सांगितले.
जडेजाकडून योजनेचा खुलासा
जडेजाने सांगितले की, त्याला येथील खेळपट्टी कसोटी क्रिकेटसारखी वाटली. त्याने यासोबतच म्हटले की, स्टम्पवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे विकेट घेण्यात मदत मिळाली. तो म्हणाला, “जेव्हा मी पहिल्या षटकाला सुरुवात केली, तेव्हा चेंडू टप्पा पडल्यानंतर संथ झाला. मला वाटले की, ऊन आहे, तर उष्णतेमुळे खेळपट्टी सुकली असेल. त्यानंतर मी विचार केला की, स्टम्पवर गोलंदाजी करणे योग्य ठरेल. इथून काही चेंडू वळले. काही चेंडू सरळ गेले, जे फलंदाजांसाठी समजणे सोपे नव्हते.”
जडेजाची कामगिरी
जडेजाने या सामन्यात 10 षटके गोलंदाजी केली. त्याच्या या स्पेलमध्ये त्याने 2 षटके निर्धाव टाकली. तसेच, 28 धावा खर्च करत सर्वाधिक 3 विकेट्स नावावर केल्या. (cricketer ravindra jadeja reveals the turning point of ind vs aus match in world cup 2023 said this)
हेही वाचा-
स्टोक्सच्या फिटनेसची तक्रार कायम! विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यातून माघार घेण्याची शक्यता, वाचा कधी करणार कमबॅक
नेदरलँड्सने न्यूझीलंडविरुद्ध केली कमाल! कॉनवे-यंगच्या नावे 48 वर्षापूर्वींचा नकोसा विक्रम