यूपी टी20 लीग स्पर्धेतील 29वा सामना बुधवारी (दि. 13 सप्टेंबर) पार पडला. या सामन्यात मेरठ मॅव्हरिक्स विरुद्ध लखनऊ फाल्कन्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात पुन्हा एकदा मेरठ संघाने विजय मिळवला. त्यांनी लखनऊ संघाला 91 धावांनी पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात रिंकू सिंग याच्यासोबतच त्याच्या सहाकारी खेळाडूनेही शानदार फलंदाजी केली. त्याने आपल्या डावात 84 धावांचे योगदान दिले.
खरं तर, रिंकू सिंग (Rinku Singh) याचा मित्र इतर कुणी नसून माधव कौशिक (Madhav Kaushik) आहे. दोघेही एकाच संघाकडून खेळतात. मेरठ संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्यांच्यासाठी योग्य ठरला. मेरठ संघाकडून सलामीला फलंदाजी करणाऱ्या उवैश अहमदने 44 धावा केल्या. त्याच्यासोबत फलंदाजीला उतरलेला पार्थ जैन 1 धाव करून बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या स्थानी माधवने शानदार खेळी साकारली. त्याने 52 चेंडूत एकूण 84 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये 5 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता.
सामन्यादरम्यान रिंकू सिंग यानेही वादळी फलंदाजी केली. रिंकूने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 184च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. यादरम्यान त्याने 13 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 24 धावा कुटल्या. अशाप्रकारे मेरठ मॅव्हरिक्स (Meerut Mavericks) संघाची एकूण धावसंख्या 20 षटकात 8 विकेट्स गमावत 193पर्यंत पोहोचली. या आव्हानाचा पाठलाग करताना लनखऊ फाल्कन्स (Lucknow Falcons) संघ 16व्या षटकातच सर्वबाद झाला. लखनऊने फक्त 102 धावा केल्या. संघाच्या एकाही फलंदाजाला 30 धावांचा आकडा पार करता आला नाही. संघाकडून सर्वाधिक धावा सत्यप्रकाश (24) याने केल्या.
यादरम्यान मेरठच्या गोलंदाजांनीही शानदार प्रदर्शन केले. कुलदीप कुमार, यश गर्ग आणि अभिनव तिवारी यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे लखनऊ संघाला या सामन्यात लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. मेरठ संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. (cricketer rinku singh friend madhav kaushik hits 84 against lucknow falcons for meerut mavericks in up t20 league read)
हेही वाचा-
पृथ्वी शॉबाबत धक्कादायक ब्रेकिंग! कोसळलाय संकटांचा डोंगर, लगेच वाचा
ना रोहित ना स्मिथ: वर्ल्डकपमध्ये फक्त दोन चेहरे असे, ज्यांनी केल्यात हजार धावा