भारतीय संघाच्या विस्फोटक यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये गणला जाणारा फलंदाज म्हणजे रिषभ पंत होय. पंत हा आक्रमक पद्धतीने फलंदाजी करतो. कसोटीसारख्या कठीण प्रकारातही टी20सारखी फलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो. त्याने अनेक सामन्यांमध्ये भारतीय संघाला सामना जिंकून दिला आहे. पंत बुधवारी (दि. 04 ऑक्टोबर) 26वा वाढदिवस साजरा करतोय. त्याचा जन्म 4 ऑक्टोबर, 1997 रोजी उत्तराखंडच्या रुडकी येथे झाला आहे. क्रिकेटपासून सध्या दूर असलेल्या पंतच्या नावावर एक खास विक्रम आहे.
भारतासाठी दमदार प्रदर्शन
रिषभ पंत (Rishabh Pant) याने भारताकडून 2016च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात भाग घेतला होता. या स्पर्धेत त्याने शानदार प्रदर्शन केले होते. त्यामुळे त्याला आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्स संघाने आपल्या ताफ्यात जोडले होते. त्यानंतर दिल्ली संघाकडून दमदार प्रदर्शन करत त्याने सर्वांची मने जिंकली. यानंतर त्याच्यासाठी भारतीय संघाचेही दार खुले झाले. त्यावेळी एमएस धोनी (MS Dhoni) कसोटीतून निवृत्त झाला होता. त्याच्या जागी वृद्धिमान साहा चमकदार कामगिरी करण्यात अपयशी ठरला होता. अशात पंतला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचे सोने केले. पंतने 2018मध्ये भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर तो भारतीय संघाच्या फलंदाजी फळीचा महत्त्वाचा भाग बनला.
पंतचा विक्रम
भारतीय संघाने 2020-21मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका 2-1ने आपल्या नावावर केली होती. ही मालिका जिंकून देण्यात रिषभ पंत याने मोलाचे योगदान दिले होते. त्याच्यामुळेच भारतीय संघ मालिका जिंकण्यात यशस्वी झाला होता. गाबा कसोटी सामन्यात त्याने भारतासाठी 89 धावांची शानदार खेळी साकारली होती. अशाप्रकारे तो ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक आहे. पंतच्या नावावर कसोटीत एका कसोटीत सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रमही आहे. त्याने 2018मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका सामन्यात 11 झेल घेत हा कारनामा आपल्या नावावर केला होता.
मागील वर्षी झाला होता अपघात
रिषभ पंत याने भारतीय संघाकडून 33 कसोटी सामने खेळताना 2271 धावा, 30 वनडे सामन्यात 865 धावा आणि 66 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 987 धावा केल्या आहेत. तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार आहे. मागील वर्षीच्या अखेरीस दिल्लीहून रुडकी येथे जाताना त्याचा गंभीर कार अपघात झाला होता. या अपघातात तो सुदैवाने वाचला होता. तेव्हापासून तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. त्याच्या गुडघ्याची सर्जरी झाली असून तो पुनरागमनासाठी तयार आहे. क्रिकेटप्रेमी त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. (cricketer rishabh pant birthday test century against australia england south africa soil indian cricket team 2023)
हेही वाचा-
तूच खरा लीडर! नेतृत्वाविषयी रोहितचे मन जिंकणारे विधान; म्हणाला, ‘इतर 10 खेळाडू…’
Asian Games: बांगलादेशची सेमी फायनलमध्ये एन्ट्री, मलेशियन खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू; भारताशी करणार दोन हात