भारतीय संघासाठी 2023 हे वर्ष खूपच महत्त्वाचे आहे. कारण, यावर्षी भारतीय संघाला आशिया चषक आणि वनडे विश्वचषक यांसारख्या मोठ्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. मात्र, दुखापतग्रस्त खेळाडूंनी संघाच्या चिंतेत मोठी भर घातली आहे. संघाचा हुकमी एका जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे दीर्घ काळापासून संघाबाहेर आहे. तसेच, रिषभ पंत हादेखील अपघातानंतर बरा होत आहे. याव्यतिरिक्त केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांसारखे मोठे खेळाडूही अद्याप फिट झाले नाहीयेत. अशात भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर याच्याविषयी मोठी माहिती समोर येत आहे, जी चाहत्यांना निराश करू शकते.
भारतीय संघाचा मधल्या फळीतील विस्फोटक फलंदाज श्रेयस अय्यर आशिया चषक 2023 (Shreyas Iyer Asia Cup 2023) स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. याव्यतिरिक्त त्याच्या वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेत खेळण्यावरही शंका व्यक्त केली जात आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याची पाठीची दुखापती अद्याप बरी झाली नाहीये. अय्यरवर एप्रिल महिन्यात शस्त्रक्रिया झाली होती. यशस्वी शस्त्रक्रियेनंतरही त्याला विश्रांती मिळत नाहीये. नुकत्याच एनसीएमध्ये त्याने वेदनेने त्रस्त होऊन इंजेक्शन घेतले होते. अय्यरची आशिया चषकात खेळण्याची शक्यता नाहीये. तसेच, विश्वचषकात खेळण्यावरही शंका आहे.
श्रेयस अय्यरला फेब्रुवारी-मार्च महिन्यात खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीदरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर तो मालिकेतून बाहेर पडला होता आणि त्यानंतरच त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती.
श्रेयस अय्यर 28 वर्षांचा असून त्याने 2017मध्ये भारताकडून वनडे पदार्पण केले होते. यानंतर तो भारताचा महत्त्वाचा सदस्य बनला होता. सन 2021मध्ये त्याने कसोटी पदार्पण केले होते. मागील वर्षी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. मात्र, मागील एक-दोन वर्षांपासून तो सातत्याने दुखापतीने त्रस्त आहे. आयपीएल 2023 हंगामातही तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व करू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत ही जबाबदारी नितीश राणा याने पार पाडली होती.
अय्यरच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने भारताकडून 10 कसोटी, 42 वनडे आणि 49 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 44.4च्या सरासरीने 666 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 5 अर्धतकांचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त त्याने वनडेत 46.6च्या सरासरीने 1631 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या नावावर 2 शतके आणि 14 अर्धशतके आहेत. तसेच, टी20त त्याने 30.68च्या सरासरीने 1043 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 7 अर्धशतके झळकावली आहेत. (cricketer shreyas iyer can miss asia cup and odi world cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
सरफराजची टीम इंडियात निवड न होण्यामागील मोठे कारण आले समोर, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने वाचला चुकांचा पाढा
वनिंदू हसरंगाचा मोठा विक्रम! वनडेत करून दाखवली आजपर्यंत कुठल्याच स्पिनरला न जमलेली कामगिरी, वाचाच