Soumya Sarkar broke Sachin Tendulkar Record: बांगलादेश क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उभय संघात 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (दि. 20 डिसेंबर) सेक्सटॉन ओव्हल, नेल्सन येथे पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने 7 विकेट्सने विजय मिळवला. हा त्यांचा सलग दुसरा विजय ठरला. त्यांनी मालिकेत 2-0ने आघाडी घेतली. सामना गमावला असला, तरीही बांगलादेशचा फलंदाज सौम्य सरकार याने न्यूझीलंडविरुद्ध इतिहास घडवला. त्याने दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याचा 14 वर्षे जुना विक्रम मोडला.
सरकारने मोडला सचिनचा विक्रम
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेत बांगलादेशला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. यावेळी बांगलादेश संघाने 49.5 षटकात 10 विकेट्स गमावत 291 धावाच केल्या. यावेळी न्यूझीलंडकडून जेकब डफी आणि विलियम ओरर्के यांनी प्रत्येकी 3 विकेट्स नावावर केल्या. यावेळी बांगलादेशकडून डावाची सुरुवात करताना सौम्य सरकार (Soumya Sarkar) याने दीडशतकी खेळी करत इतिहास घडवला.
सौम्य सरकार याने सलामीला फलंदाजी करताना 151 चेंडूत 169 धावांची विस्फोटक खेळी केली. त्याच्या या खेळीत 2 षटकार आणि 22 चौकारांचा समावेश होता. ही खेळी करताच त्याने सचिनचा 14 वर्षे जुना विक्रम उद्ध्वस्त केला. न्यूझीलंडमध्ये कोणताही आशियाई सलामी फलंदाज म्हणून वनडेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नावावर होता. त्याने 2009मध्ये ख्राईस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या वनडेत 163 धावांची खेळी केली होती. सचिन त्या सामन्यात रिटायर्ड हर्ट झाला होता. जर तो रिटायर्ड हर्ट झाला नसता, तर त्याने कदाचित कमीत कमी 175 धावा तरी नक्कीच केल्या असत्या आणि सौम्य हा विक्रम मोडू शकला नसता. मात्र, सौम्यने 169 धावा केल्या आणि सचिनचा विक्रम मोडीत काढला.
तरीही संघाचा पराभव
मात्र, दीडशतकी खेळी करूनही तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्याच्याव्यतिरिक्त एकही फलंदाज 50 धावांचाही आकडा पार करू शकला नाही. न्यूझीलंडने विजय मिळवला असला, तरीही सौम्यला त्याच्या खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
बांगलादेशच्या 292 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 46.2 षटकात 3 विकेट्स गमावत 296 धावा केल्या. तसेच, सामना 7 विकेट्सने नावावर केला. यावेळी न्यूझीलंडकडून हेन्री निकोल्स याने सर्वाधिक 95 धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त सलामीवीर विल यंगने 85, रचिन रवींद्रने 45, टॉम लॅथमने नाबाद 34 आणि टॉम ब्लंडेलने नाबाद 24 धावांची खेळी केली. (cricketer soumya sarkar broke sachin tendulkar 14 year old record against new zealand know here)
हेही वाचा-
‘रोहितला परत आणा’, म्हणत चाहत्याचा थेट मालक अंबानीलाच प्रश्न; आकाश म्हणाला, ‘चिंता नको करू, तो..’
‘माझ्या आधी 5 खेळाडू Unsold गेल्यामुळे मी लोडमध्ये होतो’, 8.4 कोटीत CSKमध्ये गेलेल्या खेळाडूचे विधान