शुक्रवारी (दि. 12 मे) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 57व्या सामन्यात सूर्यकुमार यादव याने इतिहास रचला. मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स संघात पार पडलेल्या या सामन्यात सूर्याने आयपीएल कारकीर्दीतील पहिले वहिले शतक साजरे केले. विशेष म्हणजे, त्याने या मुंबईच्या डावातील अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार मारत शतक ठोकले. सूर्याच्या खेळीच्या जोरावर मुंबईनेही 5 विकेट्स गमावत 218 धावांचा डोंगर उभारला. या खेळीनंतर विराट कोहलीने सूर्यकुमार यादवचे कौतुक केले. तसेच, इतर क्रिकेटपटूंनीही सूर्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या.
सूर्यकुमारची खेळी
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत सूर्यकुमार यादव याने 49 चेंडूत 103 धावांची नाबाद खेळी साकारली. त्याने हे शतक ठोकताना 6 षटकार आणि 11 चौकारांचाही पाऊस पाडला. हे आयपीएल 2023मधील चौथे शतक ठरले. त्याच्याआधी हॅरी ब्रूक, वेंकटेश अय्यर आणि यशस्वी जयसवाल यांनी हा पराक्रम गाजवला आहे. अशात सूर्याच्या शतकानंतर त्याचे चोहो बाजूंनी कौतुक केले जात आहे. विराट कोहली (Virat Kohli) यानेही सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या शतकावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
विराट कोहलीची प्रतिक्रिया
विराट कोहली याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर सूर्याच्या खेळीचे चक्क मराठीत कौतुक केले. विराटने सूर्याचा फोटो शेअर करत लिहिले की, “तुला मानला भाऊ.” (Tula Maanla Bhau)
आता विराट कोहली याच्या स्टोरीचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. विराटव्यतिरिक्त माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यानेही ट्वीट करत सूर्याच्या शतकावर त्याचे गोडवे गायले. त्याने लिहिले की, “गजब फलंदाजी.”
सामन्याचा आढावा
सूर्यकुमार यादव याच्या शतकाच्या जोरावर मुंबईने 5 विकेट्स गमावत 218 धावा केल्या. या धावा करताना सूर्याव्यतिरिक्त इतर एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ईशान किशन (31), विष्णू विनोद (30) आणि रोहित शर्मा (29) यांनीही धावसंख्येत योगदान दिले. यावेळी गुजरातकडून गोलंदाजी करताना राशिद खानने सर्वाधिक 4 विकेट्स आणि मोहित शर्माने 1 विकेट घेतली. (cricketer surya kumar yadav first century in ipl virat kohli reacts Tula Maanla Bhau)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या–
सूर्याचा सचिनला मागे टाकणारा विक्रम! दिग्गजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी
बिग ब्रेकिंग! अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत सूर्याने झळकावले IPLचे पहिले शतक, मुंबईचा स्कोर 200च्या पार