Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0ने आघाडी घेतली आहे. अशात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसरा सामना मंगळवारी (दि. 28 नोव्हेंबर) गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात सूर्याकडे विराट कोहली याचा मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे. चला तर, तो कोणता विक्रम आहे, पाहूयात…
सूर्याच्या निशाण्यावर विराटचा विक्रम
तिसऱ्या टी20 सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या बॅटमधून 60 धावा निघताच, तो भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये वेगवान 2000 धावा करणारा फलंदाज बनेल. हा विक्रम सध्या विराट कोहली (Virat Kohli) याच्या नावावर आहे.
सूर्यकुमार यादवने भारताकडून आतापर्यंत 55 टी20 सामन्यातील 52 डावात फलंदाजी करताना 46.19च्या सरासरीने आणि 173.52च्या स्ट्राईक रेटने 1940 धावा केल्या आहेत. तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण करण्यापासून फक्त 60 धावा दूर आहे. जर सूर्याने तिसऱ्या टी20त या धावा केल्या, तर तो या क्रिकेट प्रकारात वेगवान 2 हजार धावा करणारा भारतीय फलंदाज बनेल. तसेच, जागतिक क्रिकेटमध्ये तो टी20त सर्वात वेगवान 2 हजार धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बनेल.
खरं तर, विराट कोहली सध्या टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा (4008) करणारा फलंदाज आहे. त्याने त्याच्या टी20 कारकीर्दीत 2 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी 56 डाव खेळले होते. सूर्याकडे पुढील दोन सामन्यातही विराटचा विक्रम मोडण्याची संधी असेल.
सर्वात वेगवान 2000 धावा
दुसरीकडे, जागतिक क्रिकेटबद्दल बोलायचं झालं, तर टी20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 2000 धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम याच्या नावावर आहे. बाबरने ही कामगिरी 52 डावांमध्ये केली होती. तसेच, त्याचा सहकारी मोहम्मद रिझवान या यादीत 52 डावांसोबतच दुसऱ्या स्थानी आहे. बाबरने रिझवानपेक्षा कमी काळात 2000 धावा पूर्ण केल्या होत्या, त्यामुळे तो या यादीत अव्वलस्थानी आहे. (cricketer suryakumar yadav eyes on virat kohli great record fastest 2000 runs in t20i by indian ind vs aus 3rd t20i)
हेही वाचा-
T20 World Cup 2024मध्ये भारतीय संघाचा कर्णधार पंड्या नकोच, झहीर खानने सुचवलं ‘हे’ नाव
अर्रर्र! बुमराहच्या Insta Storyने माजवली खळबळ, मुंबईला केलं अनफॉलो; RCB संघात जाणार का? चाहतेही गोंधळात