विश्वचषक 2023 स्पर्धेतील 12वा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात खेळला जात आहे. नरेंद्र मोदी स्टेडिअमवर तब्बल 1 लाख 25 हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सामना पार पडत आहे. सामन्याची नाणेफेक भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच, पाकिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र, राष्ट्रगीतावेळी आणि सामन्यात उतरल्यानंतर विराट कोहली याच्याकडून एक चूक घडली. चला तर, त्याविषयी जाणून घेऊयात…
विराटकडून मोठी चूक
नाणेफेकीनंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानावर आले होते. यावेळी भारतीय विस्फोटक फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हादेखील संघासोबत मैदानावर उपस्थित होता. विश्वचषकात भारतीय संघासाठी विशेष जर्सी बनवली आहे. जिच्या खांद्यावर केशरी, पांढरा आणि हिरवा या राष्ट्रध्वजातील तीन रंगाच्या लाईन आहेत. मात्र, विराट जेव्हा राष्ट्रगीतासाठी मैदानावर उतरला तेव्हा, तो पांढऱ्या लाईन असणाऱ्या जर्सीत होता.
मैदानावरही पांढरी पट्टी असणाऱ्या जर्सीत दिसला विराट
ज्यावेळी सामन्याला सुरुवात झाली, तेव्हाही विराट काही षटके पांढऱ्या रंगाची पट्टी असलेल्या जर्सीतच होता. मात्र, जेव्हा त्याला चूक समजली, तेव्हा विराटने मैदानाबाहेर जाऊन आपली जर्सी बदलली. त्यानंतर तो तिरंगी पट्टीच्या जर्सीत मैदानात परतला. आता त्याचे पांढऱ्या रंगाच्या पट्टीच्या जर्सीतील फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
भारताला पहिली विकेट
या सामन्यात भारतीय संघ पहिल्या विकेटसाठी संघर्ष करत होता. मात्र, 8वे षटक टाकण्यासाठी आलेल्या जसप्रीत बुमराह याने अखेरच्या चेंडूवर अब्दुल्ला शफीक याला 20 धावांवर तंबूत धाडले. यावेळी 8 षटकांनंतर पाकिस्तानने 1 बाद 41 धावा केल्या होत्या. (cricketer Virat Kohli by mistake comes on the field by wearing the white stripes jersey instead of the tricolour one)
विश्वचषकातील 12व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
पाकिस्तान
अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ
हेही वाचा-
सव्वा लाख भारतीयांच्या मुखातून गायले गेले राष्ट्रगीत, पाहा अंगावर काटे आणणारा व्हिडिओ
पाकिस्तानविरुद्ध भारताचा ‘हा’ गोलंदाज ठरेल गेमचेंजर; इंग्लंडच्या विश्वविजेत्या कर्णधाराला विश्वास