भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या ७१ व्या शतकासाठी सर्व चाहते उत्सुक आहेत. मागील २ वर्षांपेक्षा अधिक काळापासून त्याच्या बॅटमधून एकही शतक आले नाहीये. असे असले, तरी यादरम्यान त्याच्या सरासरी ५०पेक्षा जास्ती राहिली आहे. मात्र, आता कसोटी क्रिकेटमधील त्याची सरासरी ५०च्या खाली आली आहे. २०१७ नंतर असे पहिल्यांदाच झाले आहे की, विराटची फलंदाजी सरासरी ५० पेक्षा खाली आली आहे.
भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात विराटने (Virat Kohli) २३ धावा आणि दुसऱ्या डावात अवघ्या १३ धावाच केल्या. यामुळे त्याची सरासरी धपकन खाली आली आहे. विराटला श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत फक्त ४२ धावांची आवश्यकता होती. जेणेकरून त्याची ५०पेक्षा जास्त सरासरी कायम राहिली असती. मात्र, असे काहीच झाले नाही. फॉर्ममध्ये नसल्यामुळे विराटची सरासरी आता ६ वर्षांनंतर ५०च्या खाली आली आहे.
विराटने आपले मागील शतक नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध ठोकले होते. त्याचे हे शतक कोलकाताच्या ईडन गार्डन्समधील गुलाबी चेंडू कसोटीत आले होते. मात्र, त्यानंतर त्याच्या फलंदाजी सरासरीत २८.७५ची घसरण झाली आहे. ७०व्या शतकापर्यंत विराटची सरासरी ५४.९७ इतकी होती. त्याने आपल्या ५२ व्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध वानखेडे स्टेडिअममध्ये ५०ची सरासरी मिळवली होती. त्यावेळी त्याने पहिल्या डावात २३५ धावांचा पाऊस पाडला होता.
त्यानंतर विराटने २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुणे कसोटीत २५४ धावा ठोकत कारकिर्दीतील सर्वोत्तम ५५.१० सरासरी मिळवली होती. मात्र, त्यानंतर त्याची सरासरी घसरत गेली.
विराट कोहलीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १०० कसोटी सामने, २६० वनडे सामने आणि ९७ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ५०.३६ च्या सरासरीने ८००७ धावा, वनडेत ६८.०७ च्या सरासरीने १२३११ धावा आणि आंतरराष्ट्रीय टी२०त ५१.५० च्या सरासरीने ३२९६ धावा केल्या आहेत.