Vrinda Dinesh WPL 2024 Auction: महिला प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेचा लिलाव शनिवारी (दि. 9 डिसेंबर) मुंबईत पार पडला. यादरम्यान अनेक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लागली. त्यात अनकॅप्ड खेळाडू वृंदा दिनेश हिच्या नावाचाही समावेश होता. वृंदा दिनेशवर यूपी वॉरियर्स संघाने 1 कोटी 30 लाख रुपयांची बोली लावत संघात घेतले. अशाप्रकारे ती डब्ल्यूपीएल 2024 लिलावात दुसरी सर्वाधिक रुपयांत विकली गेलेली अनकॅप्ड भारतीय खेळाडू ठरली. लिलावात सर्वाधिक बोली लागलेली भारताची पहिली अनकॅप्ड खेळाडू काशवी गौतम आहे. तिला गुजरात जायंट्सने 2 कोटी रुपयांमध्ये ताफ्यात सामील केले होते.
काय म्हणाली वृंदा?
यूपी वॉरियर्झ (UP Warriorz) संघाने जेव्हा कर्नाटकची फलंदाज वृंदा दिनेश (Vrinda Dinesh) हिला ताफ्यात घेतले, तेव्हा तिने रायपूरहून बंगळुरूत असलेल्या आपल्या आईला व्हिडिओ कॉल केला नाही. कारण, तिला माहिती होते की, तिला तिच्या भावनांवर नियंत्रण ठेवता येणार नाही. वृंदाने शनिवारी यूपी वॉरियर्झशी बोलताना म्हटले की, “मला वाटते की, तिच्या (आई) डोळ्यात अश्रू होते. मी व्हिडिओ कॉल केला नव्हता. कारण, मी तिच्या डोळ्यात अश्रू पाहू शकत नव्हते. मी तिला फक्त फोन केला.”
कोट्यवधी रुपयांचं काय करणार वृंदा?
वृंदा दिनेश 1 कोटी 30 लाख (Vrinda Dinesh 1 Crore 30 Lakh) रुपयांचं काय करणार? असा प्रश्न विचारला असता, तिने आधीच याची योजना तयार केली होती. ती म्हणाली, “मला माहिती होते की, ते भारावून गेले आहेत. ते माझ्यासाठी खूपच खुश होते. त्यांना माझा अभिमान वाटावा, एवढंच मला हवं होतं. मी माझ्या आई-वडिलांना ती कार घेऊन देईल, ज्याचे त्यांनी नेहमीच स्वप्न पाहिले. सध्या माझे पहिले ध्येय हेच आहे आणि बाकीचं नंतर पाहू.”
Howzatt for a purchase!
The @UPWarriorz have Vrinda Dinesh for a whopping INR 1.3 Cr 🔥🔥#TATAWPLAuction | @TataCompanies pic.twitter.com/t6Su8jPtkk
— Women's Premier League (WPL) (@wplt20) December 9, 2023
जास्त रक्कमेत विकले जाणे नेहमीच खेळाडूंना दबावात टाकते, ज्यामुळे त्यांच्या प्रदर्शनावर प्रभाव पडतो. याविषयी बोलताना वृंदा म्हणाला की, “एवढ्या पैशांमध्ये विकले जाणे माझ्या हातात नाहीये. मला निवडले गेले आहे आणि मी माझे सर्वोत्तम देऊ इच्छिते. मला वाटत नाही की, या पैशांनी जास्त फरक पडेल. कारण, शेवटी मी इथे खेळण्यासाठी आले आहे आणि खेळाचा आनंद लुटण्यासाठी.”
पुढे बोलताना वृंदाने तिच्या इच्छा व्यक्त केल्या. त्यापैकी एक म्हणजे, तिला कर्णधार एलिसा हिलीसोबत डावाची सुरुवात करायची आहे. ती म्हणाली की, “एलिसा हिलीच्या नेतृत्वात खेळणे, ताहलिया मॅकग्रा, डॅनी वाएट आणि सोफी एक्लेस्टोन यांचे संघात असणे शानदार आहे, जे महिला क्रिकेटमधील महान खेळाडू आहेत. मी नेहमीच त्यांच्यासोबत खेळण्याचा विचार केला होता, पण असे माझ्यासोबत घडेल, याचा कधीच विचार केला नव्हता.”
वृंदाविषयी बोलायचं झालं, तर 1 कोटी 30 लाख रुपयांची मालकीण बनलेली फलंदाज सध्या महिलांच्या 23 वर्षांखालील टी20 ट्रॉफीच्या तयारीसाठी रायपूरमध्ये आहे. आता पुढील काही महिन्यात सुरू होणाऱ्या डब्ल्यूपीएल 2024 (WPL 2024) स्पर्धेत वृंदा कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. (cricketer vrinda dinesh want to gift parents dream car wpl 2024 auction)
हेही वाचा-
पाटलांच्या लेकीने आणले इंग्लिश फलंदाजांच्या नाकी नऊ, पदार्पणाच्या मालिकेत POTM पुरस्कार जिंकताच म्हणाली…
‘BCCI इतके पैसे नाहीयेत, पण तुम्ही…’, पावसामुळे सामना रद्द होताच गावसकरांच्या तळपायाची आग मस्तकात