2024 टी20 विश्वचषकाला धमाकेदार सुरुवात झाली आहे. अमेरिका आणि कॅनडा यांच्यात झालेल्या पहिल्याच सामन्यात चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. आयसीसीच्या या मेगा इव्हेंटमध्ये भारतीय वंशाचे अनेक क्रिकेटपटू दुसऱ्या देशांकडून खेळत आहेत. आज या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला अशाच क्रिकेटपटूंबद्दल सांगणार आहोत.
अमेरिका – अमेरिकेच्या क्रिकेट संघात एक-दोन नव्हे तर तब्बल 6 भारतीय वंशाचे क्रिकेटपटू आहेत. संघाचा कर्णधार यष्टीरक्षक फलंदाज मोनांक पटेल हा भारतीय वंशाचा आहे. मोनांक व्यतिरिक्त या संघात हरमीत सिंग, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार आणि सौरव नेत्रावलकर हे भारतीय वंशाचे क्रिकेटपटू आहेत.
न्यूझीलंड – न्यूझीलंड क्रिकेट संघात भारतीय वंशाचा एकच क्रिकेटपटू आहे. हा खेळाडू आहे स्टार ऑलराऊंडर रचिन रवींद्र. रचिन हा फिरकी अष्टपैलू खेळाडू आहे, जो फलंदाजीत जास्त योगदान देतो. रचिन बॅटनं काय कमाल करू शकतो, हे त्यानं 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात दाखवून दिलं होतं.
दक्षिण आफ्रिका – दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघात एक भारतीय वंशाचा क्रिकेटपटू आहे, तो म्हणजे केशव महाराज. फिरकी गोलंदाज केशव महाराज दक्षिण आफ्रिकेला टी20 विश्वचषक स्पर्धेत चॅम्पियन बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसणार आहे.
युगांडा – युगांडा क्रिकेट संघात भारतीय वंशाचे दोन खेळाडू आहेत. अल्पेश रामजानी आणि रौनक पटेल हे ते दोन खेळाडू आहेत. दोघेही संघाचे महत्त्वाचे भाग आहेत. अशा परिस्थितीत त्यांना 2024 टी20 विश्वचषकात आपली छाप सोडायची आहे.
कॅनडा – कॅनडाच्या क्रिकेट संघानं टी20 विश्वचषक 2024 चा पहिला सामना अमेरिकेविरुद्ध खेळला होता. कॅनडाच्या संघात 4 भारतीय वंशाचे खेळाडू आहेत. या 4 खेळाडूंमध्ये रवींद्रपाल सिंग, निखिल दत्ता, परगट सिंग आणि श्रेयस मोव्वा यांचा समावेश आहे.
ओमान – ओमानच्या टी20 विश्वचषक संघातही एका भारतीय खेळाडूचा समावेश आहे. कश्यप प्रजापती असं या खेळाडूचं नाव आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाचा हेड कोच बनण्याच्या चर्चांवर गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “हा सन्मान…”
अमेरिका-कॅनडाचा क्रिकेट इतिहास आहे 180 वर्ष जुना! ‘या’ वर्षी खेळला गेला होता पहिला सामना