ऑस्ट्रेलियाला वनडे मालिकेत ४-१ अशी धूळ चारल्यानंतर भारत आता ७ तारखेपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. भारत वनडेप्रमाणेच टी-२० मध्ये पण वर्चस्व राखण्याचा प्रयन्त करेल तर ऑस्ट्रेलिया नवीन फॉरमॅटमध्ये दौऱ्याला एक नवीन सुरुवात देण्याचा प्रयत्न करेल.
२०१६ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला टी-२० मधेच घरच्या मैदानावर व्हाईट-वॉश दिला होता. आजपर्यंत हे दोन देश १३ टी२० सामने खेळले असून त्यात भारताने ९ विजय मिळवले आहेत. तर ४ सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. भारताने गेल्या ६ सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे त्यात एका टी२० मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर व्हाईट-वॉश दिला आहे.
भारत आता आयसीसीच्या टी-२० रँकिंग मध्ये ५व्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलिया ७व्या क्रमांकावर आहे. भारताने वनडे सामन्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या अजिंक्य रहाणेला संघातून बाहेर ठेवले आहे तर अश्विन आणि जडेजा तर वनडे मालिकेपासून संघाबाहेर आहेत. आशिष नेहरा आणि दिनेश कार्तिकला संघात स्थान देण्यात आले आहे तर संघात शिखर धवनचे ही पुनरागमन झाले आहे.
सलामीवीर (रोहित शर्मा आणि शिखर धवन)
भारताची सलामीची जोडी आता तरी अफलातून फॉर्ममध्ये दिसत आहे. रोहित शर्माने मागील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत तो दाखवून दिला आहे. तर त्याचा जोडीदार शिखर धवन ही संघात परत आला आहे. त्याच बरोबर पर्याय म्हणून के एल राहुलही सलामीला येऊ शकतो आणि तो ही फॉर्ममध्ये आहे पण त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत एकही सामना खेळायला मिळाला नव्हता.
मधली फळी (विराट कोहली, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी)
विराटचा सध्याचा फॉर्म बघता तो किमान भारतासाठी अजून ५ वर्ष तरी नंबर ३ राहील असे दिसून येते. सलामीवीर फलंदाजांना दुखापती झाल्यामुळे विराट मागील काही मालिकेत सलामीला येत होता पण या सामन्यात अशी काही गरज दिसत नाही. विराट कोहली हा आता आयसीसी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे.
मनीष पांडे
भारतासाठी टी-२० आणि वनडेमध्ये चौथ्या क्रमांकावर कोणी यायचं हे कोड अजूनही रवी शास्त्रींना उलगडलेलं नाही. कारण कोणताच फलंदाजाने युवराज नंतर त्या क्रमांकावर चांगली फलंदाजी केलेली नाही. हार्दिक पंड्या, केदार जाधव आणि मनीष पांडे या सर्वानी या जागेवर फलंदाजी करण्याचा प्रयन्त केला आहे, पण त्याना म्हणावं तस यश मिळाले नाही. पण सर्व क्रिकेट पंडितांच्या मते मनीष हा या जागेसाठी चांगला पर्याय आहे.
महेंद्रसिंग धोनी
धोनी या क्रमांकासाठी एक उत्तम पर्याय आहे. सध्यातरी धोनीसाठी येथे पर्याय खूपच कमी आहेत. या क्रमांकावर खेळताना धोनीने भारताकडून टी२० प्रकारात सार्वधिक धावा केल्या आहेत.
अष्टपैलू खेळाडू (हार्दिक पंड्या आणि केदार जाधव)
विराट कोहली जेव्हापासून कर्णधार झाला आहे तेव्हापासून या दोन खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. पंड्या गोलंदाजीमध्ये प्रत्येक सामन्यात एक दोन विकेट्स मिळवतो व फलंदाजीमध्ये आल्याबरोबर मोठे फटके मारून धावगती वाढवतो. हार्दिकने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण मागील वर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्धच केले होते. तर केदार ही त्याच्या सारखाच फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगले योगदान देत आहे.
फिरकी गोलंदाज (कुलदीप यादव आणि युझर्वेंद्र चहल)
सध्या जगातील सर्वात चांगले फिरकी गोलंदाज भारतीय संघाकडे आहेत. रवींद्र जडेजा आणि आर अश्विन हे ते दोन प्रतिभावान खेळाडू. यांना या ही मालिकेत विश्रांती देऊन अक्सर पटेल, युझर्वेंद्र चहल आणि कुलदीप यादव या नव्या दमाच्या गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. जडेजा आणि अश्विन हे गेल्या काही टी-२० मालिकेत चांगली कामगिरी करता आलेली नाही. तर हे दोन्ही फिरकी गोलंदाज टी-२० स्पेशलिस्ट मानले जातात.
वेगवान गोलंदाज (जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार )
यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून भारतभर प्रसिद्ध झालेल्या जसप्रीत बुमरा आणि भूवनेश्वर कुमार हे दोनीही भारतातीलच नाही तर जगातील सर्वोत्तम टी-२० गोलंदाजांनापैकी एक आहे. भुवनेश्वर कुमारने ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे मालिकेत चांगली गोलंदाजी केली आहे. बुमराने पंड्याबरोबरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०१६ला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच पदार्पण केले होते आणि तेव्हा पासूनच त्याने संघात स्थान निश्चित केले आहे. जसप्रीत बुमराह हा भारताचा टी२० मध्ये दुसरा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज आहे.