जेव्हापासून अजित आगरकर यांनी भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता म्हणून पदभार स्वीकारला आहे, तेव्हापासून संघाच्या कामगिरीत चढ-उतार दिसला आहे. संघाने मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये लक्षवेधी कामगिरी केली, मात्र कसोटीमध्ये भारताची कामगिरी निराशाजनक झाली आहे. त्याचबरोबर काही वरिष्ठ खेळाडूंच्या कारकिर्दीबाबत आणि त्यांच्या निवृत्तीच्या निर्णयावरही वाद निर्माण झाले. त्यामुळे लवकरच आगरकर यांना पदावरून काढले जाऊ शकते, अशा चर्चा सुरू झाल्या. तसेच त्यांची जागा घेण्यासाठी एका अनुभवी खेळाडूचे नावही समोर आले, मात्र आता त्या खेळाडूने निवडकर्ता होण्यास नकार दिला आहे.
व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे नाव भारतीय संघाचा मुख्य निवडकर्ता म्हणून चर्चेत आले. आगरकर यांच्या भवितव्याबद्दल आणि ते 2027 च्या वनडे विश्वचषकापर्यंत मुख्य निवडकर्ता म्हणून कायम राहतील की नाही, यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अद्याप निर्णय घेतलेला नाही. लक्ष्मण यांनी मात्र त्यांची भुमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी नजीकच्या भविष्यात CoE सोडण्याचा त्यांचा कोणताच इरादा नाही, असे सांगितले आहे. लक्ष्मण हे सध्या बंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्सचे (CoE) प्रमुख आहेत.
माजी BCCI सचिव जय शाह यांनी दिलेले स्वातंत्र्य, तसेच सध्याचे सचिव देवजित सैकिया यांचा पाठिंबा यांमुळे मी त्यांना CoE मधील आपले काम सुरूच ठेवण्याचे वक्तव्य लक्ष्मण यांनी केले आहे.
“माजी सचिव आणि BCCI ने मला माझी दूरदृष्टी प्रत्यक्षात आणण्याचे स्वातंत्र्य दिले. तसेच काम देवजित करत आहेत, त्यामुळे मी माझा कार्यकाळ दोन वर्षांसाठी वाढवला आहे. तसेच मी BCCI ला वचन दिले आहे की मी मुख्य प्रशिक्षक पद स्वीकारणार नाही. तुम्हा सर्वांना माहीत आहे की 2024 मध्ये माझ्याशी या पदासंदर्भात संपर्क साधण्यात आला होता”, असे लक्ष्मण यांनी पीटीआयला सांगितले आहे.
“मी 2023 मध्ये मुख्य प्रशिक्षक होणार होतो, मात्र वैयक्तिक कारणांमुळे मी ते पद स्वीकारू शकलो नाही. मी जय (शाह) यांच्याशी दोनदा बोललो. त्यांना माझी कारणे समजली,” असेही लक्ष्मण यांनी पुढे म्हटले आहे.
लक्ष्मण यांच्या या वक्तव्यावरून आगरकरांबरोबर गंभीरचेही संकट टळल्याचे दिसते. कारण मागील काही दौऱ्यांमध्ये गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाची मर्यादित षटकांच्या मालिकांमध्येही अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली नाही. त्यामुळे झिम्बाब्वे दौऱ्यात संघ लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनाखाली टी 20 मालिका खेळला आणि जिंकलाही. त्यामुळे मुख्य प्रशिक्षकपदासाठी लक्ष्मण यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले होते.
राहुल द्रविडने 2023 नंतर मुख्य प्रशिक्षक पद सोडण्याचा निर्णय घेतला होता, मात्र सहकाऱ्यांच्या विनंतीनंतर त्याने काही काळ आणखी पदावर काम केले आणि भारताने 2024 चा टी20 विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली. तेव्हा भारताचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळण्याची जबाबदारी लक्ष्मणने नाकारल्याचा खुलासा आता त्यांनी केला आहे. तसेच तेव्हा त्यांना CoE ची जबादारी देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते.
द्रविडनंतर गौतम गंभीर संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. तो या पदावर 2027 पर्यंत राहण्याची शक्यता आहे.






