महिला टी-20 वर्ल्ड कप 2026 (ICC T20 WC 2026) मध्ये आतापर्यंत फक्त इंग्लंड संघानेच उपांत्य फेरीत (सेमीफायनल) स्थान निश्चित केले आहे, तर पाकिस्तानसह चार संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. ग्रुप ‘ए’ मध्ये भारतीय महिला संघासमोर आता मोठे आव्हान निर्माण झाले आहे. टीम इंडिया सध्या पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असली तरी, त्यांचे सेमीफायनलचे भवितव्य इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. स्पर्धेत आतापर्यंत फक्त एकच सामना हरूनही भारतीय संघ आता बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे.
ग्रुप ‘ए’ च्या पॉइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया 8 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांचे प्रत्येकी 6 गुण आहेत, परंतु नेट रन रेटमुळे भारत सध्या पुढे आहे. आता तिन्ही संघांचा शेवटचा एक-एक सामना शिल्लक आहे. अशी स्थिती निर्माण होऊ शकते की भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या तिन्ही संघांचे 8-8 गुण होतील. अशा वेळी सेमीफायनलमध्ये कोणता संघ जाणार, याचा निर्णय नेट रन रेटच्या आधारावर घेतला जाईल.
भारताचा शेवटचा सामना 28 जून रोजी बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Indw vs Ausw) आहे. ऑस्ट्रेलियासारख्या सहा वेळा चॅम्पियन राहिलेल्या संघाविरुद्ध खेळणे हेच टीम इंडियासाठी मोठे आव्हान आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा शेवटचा सामना तुलनेने कमकुवत असलेल्या बांगलादेशशी आहे, ज्यामुळे भारताची चिंता वाढली आहे. 28 जून रोजी दोन सामने होणार आहेत. जर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला हरवले, तर त्यांचे 8 गुण होतील. अशा स्थितीत टीम इंडियाकडे उपांत्य फेरीत जाण्याचा एकच मार्ग उरेल. तो म्हणजे ऑस्ट्रेलियाला कोणत्याही परिस्थितीत हरवणे. जर आफ्रिकेने 8 गुण मिळवले आणि भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरला, तर टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर होईल. मात्र, एक आशा अशीही आहे की, जर दक्षिण आफ्रिका बांगलादेशविरुद्धचा सामना हरला, तर भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरूनही नेट रन रेटच्या जोरावर सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतो.






