स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो त्याच्या विक्रमांसाठी ओळखला जातो. फुटबॉलच्या मैदानावर त्याच्या नावे असंख्य विक्रम आहेत. आता रोनाल्डोनं सोशल मीडियावर देखील धुमाकूळ घातला आहे. रोनाल्डोनं काल (21 ऑगस्ट) यूट्यूबवर पदार्पण केलं आणि अवघ्या 90 मिनिटांत विश्वविक्रम केला.
रोनाल्डोचं यूट्यूब चॅनल सक्रिय झाल्यानंतर 90 मिनिटांत त्याला 1 मिलियन (10 लाख) फॉलोअर्स मिळाले. यासह तो YouTube च्या इतिहासात सर्वात जलद 10 लाख सबस्क्राइबर्स पूर्ण करणारा सेलिब्रिटी बनला आहे. यूट्यूबवर ज्या चॅनलचे 10 लाख सबस्क्राइबर्स पूर्ण होतात, त्यांना गोल्डन बटन दिलं जातं. रोनाल्डोलाही हे बटन मिळालं आहे. याचा व्हिडिओ त्यानं त्याच्या चॅनलवर शेअर केला.
रोनाल्डोनं सांगितलं की, चाहत्यांना या चॅनलवर त्याच्या आयुष्याची एक वेगळी बाजू पाहायला मिळेल. येथे तो त्याचं कुटुंब, ट्रेनिंग, शिक्षण आणि व्यवसायाशी संबंधित व्हिडिओ पोस्ट करेल. रोनाल्डो म्हणाला, “सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी नातं निर्माण करणं मला नेहमीच आवडतं. यूट्यूबच्या माध्यमातून मला चाहत्यांशी जोडण्यासाठी एक मोठं व्यासपीठ मिळेल. येथे तुम्ही माझ्याबद्दल आणि माझ्या कुटुंबाबद्दल जाणून घ्याल.”
रोनाल्डो जगभरात सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केला जाणारा व्यक्ती आहे. ‘X’ प्लॅटफॉर्मवर त्याचे 112 मिलियन (11.2 कोटी) फॉलोअर्स आहेत. तर फेसबुकवर त्याचे 170 मिलियन (17 कोटी) आणि इंस्टाग्रामवर 636 मिलियन (63.6 कोटी) फॉलोअर्स आहेत. तो इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केला जाणारा सेलिब्रिटी आहे. या यादीत स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी दुसऱ्या स्थानावर आहे, मात्र तो रोनाल्डोपेक्षा खूपच मागे आहे. मेस्सीचे इंस्टाग्रामवर 504 मिलियन फॉलोअर्स आहेत. विराट कोहली या यादीतील तिसरा खेळाडू आहे, ज्याचे 270 मिलियन फॉलोअर्स आहेत.
हेही वाचा –
कसोटी क्रिकेटचा थरार! भारताच्या इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर, 17 वर्षांचा वनवास संपेल का?
श्रीलंकेच्या फलंदाजाचा मोठा पराक्रम! बलविंदर सिंग संधू यांचा 41 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला
“मी थांबणार नाही…”, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि WTC चे जेतेपद पटकवाण्यासाठी रोहितने भुंकला रणशिंग!