सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यासारख्या दिग्गज फलंदाजांनी आपल्या कारकीर्दीत विक्रमांचे थर रचले. अनेक गोलंदाजांची गोलंदाजी आपल्या बॅटने फोडून काढत क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता. पण जागतिक क्रिकेटमध्ये असा एक वेगवान गोलंदाज होता ज्याने आपल्या गोलंदाजीने या दिग्गज खेळाडूंना खूप सतावले होते. तो खेळाडू म्हणजे न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज डॅरेल टफी. त्याचा आज ४२ वा वाढदिवस आहे.
अचूक टप्पा आणि वेग यांचा संयोग साधत गोलंदाजी करण्यात टफी पटाईत होता. सुरुवातीच्या षटकात ‘ब्रेकथ्रू’ मिळवून विरोधी संघाला ‘बॅकफूट’वर ढकलण्यात तो माहीर होता. न्यूझीलंडकडून खेळताना 26 कसोटी सामन्यात 77 बळी घेतले तर 94 वनडे सामन्यात त्याच्या नावावर 110 बळीची नोंद आहे. २००० ते २०१० या काळात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले होते.
टफीने भारत आणि पाकिस्तानविरुद्ध खेळताना दमदार कामगिरी केली आहे. आपल्या धारदार गोलंदाजीने वनडेत भारताविरुद्ध खेळताना 24 आणि पाकिस्तानविरुद्ध 32 गडी बाद केले. भारताविरुद्ध खेळताना 4 कसोटी सामन्यात तब्बल 21 गडी बाद केले तर पाकिस्तानविरुद्धच्या 8 कसोटी सामन्यात 32 बळीची नोंद त्याच्या नावावर आहे.
एकाच सामन्यात पाठवले तीन भारतीय महारथींना तंबूत
डॅरेल टफीने १९-२२ डिसेंबर २००२ रोजी हॅमिल्टन कसोटीत संजय बांगर, राहुल द्रविड, सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली व पार्थिव पटेल यांना तंबूत पाठवले होते. न्यूझीलंडने हा सामना ४ विकेट्सने जिंकला होता. टफीलाच या सामन्यात सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
एका षटकात टाकले तब्बल चौदा चेंडू
अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यात माहीर असलेल्या डॅरेल टफीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना एका षटकात तब्बल चौदा चेंडू फेकले. तसेच या षटकात पहिला चेंडू टाकण्यापूर्वी 14 धावा विरोधी संघाला दिल्या होत्या.
वादग्रस्त कारकीर्द
डॅरेल टफीची कारकीर्द वादग्रस्त देखील राहिली आहे. 2005 साली त्याचे एक सेक्स स्कँडल प्रकरण समोर आले होते. ब्रिटनमधील दोन महिला पर्यटकांनी त्याचा एक सेक्स टेप बनवला. त्यानंतर क्राईस्टचर्च येथील पबमध्ये तो प्रसारित करण्यात आला. त्यानंतर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर एक हजार न्यूझीलंड डॉलरचा दंड लावला.
मॅच फिक्सिंगचे आरोप
2007 साली डॅरेल टफी ऑकलंडमध्ये दारू पिऊन गाडी चालवताना पकडला गेला. त्याच्याकडून ऑकलंड कोर्टाने 420 न्यूझीलंड डॉलरचा दंड वसूल लावला. त्यानंतर आयसीएल अर्थात इंडियन क्रिकेट लीगमध्ये चंदिगड लायन्सकडून खेळताना त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप लावण्यात आले. मात्र त्याने मॅच फिक्सिंगचे हे सारे आरोप फेटाळून लावले.