मुंबई । यंदाच्या आयपीएलला आता काही तास शिल्लक आहेत. शनिवारी 19 सप्टेंबर रोजी आयपीएलची सुरुवात या स्पर्धेतील दोन सर्वात यशस्वी संघ, चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. या सामन्यात असे बरेच खेळाडू आहेत ज्यांच्याकडे सर्वांचे लक्ष आहे. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांची या यादीत पहिल्यांदा नावे आहेत. अष्टपैलू कामगिरी करुन भारतीय संघात आपले स्थान निश्चित करणारा रवींद्र जडेजादेखील खूप महत्त्वाचा आहे. त्याला या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी आहे.
आयपीएलच्या उद्घाटन सामन्यात रवींद्र जडेजाने 73 धावा जमवल्यास तो आयपीएलमध्ये 2000 धावा पूर्ण करेल. तसेच आयपीएल इतिहासातील 2000 धावा आणि 100 विकेट्स आपल्या नावावर करणारा तो पहिला अष्टपैलू खेळाडू बनेल. आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही अष्टपैलू खेळाडूने ही कामगिरी केलेली नाही. जडेजा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स व्यतिरिक्त राजस्थान रॉयल्स, कोची टस्कर्स केरळ आणि गुजरात लायन्सकडून खेळला आहे. तसेच सध्याच्या आकडेवारीनुसरा आतापर्यंत त्याने आयपीएलमध्ये 1927 धावा आणि 108 विकेट्स घेतल्या आहेत.
एवढेच नव्हे तर या स्पर्धेत अर्धशतकाशिवाय 1500 धावा पूर्ण करण्याचा विक्रम रवींद्र जडेजाच्या नावावर आहे. याचे कारण म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज फलंदाजीची लाईनअप खूपच मजबूत आहे. फलंदाजीस खूप खालच्या क्रमांकावर पाठविल्यामुळे त्याला फलंदाजी करण्याची फारशी संधी मिळत नाही. त्यामुळे असे दिसते आहे की, जडेजाला आयपीएलच्या उद्घाटन सामन्यात 2000 धावा पूर्ण करण्याची फारशी शक्यता नाही.
तथापि, त्याच्याकडे संपूर्ण हंगामात हा विक्रम करण्याची संधी असेल. या कालावधीत संघ लीगच्या टप्प्यात 14 सामने खेळणार आहे. याशिवाय प्लेऑफ सामनेही वेगळे आहेत. रवींद्र जडेजाने राजस्थान रॉयल्सपासून आयपीएल कारकीर्दीची सुरुवात केली होती. तो 2008 मध्ये विजेतेपद मिळविणार्या राजस्थान रॉयल्सच्या संघात देखील होता.





