MLC: मेजर लीग क्रिकेटच्या फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी सीएसके (टेक्सास सुपर किंग्ज) आणि एमआय न्यूयॉर्क यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. दोन्ही संघ चॅलेंजर फेरीत आमने-सामने असतील. सुपर किंग्जचे नशीब खराब होते, कारण पहिला क्वालिफायर पावसामुळे रद्द झाला. गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असल्याने, त्यांना आता फायनलमध्ये पोहोचण्यासाठी ‘चॅलेंजर’मध्ये एमआयचा सामना करावा लागणार आहे. तर, एमआयने एलिमिनेटर सामन्यात सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सला हरवून ‘चॅलेंजर’मध्ये आपले स्थान पक्के केले आहे. (Major League Cricket Challenger)
सुपर किंग्ज आणि एमआय यांच्यातील ‘चॅलेंजर’ सामना भारतीय वेळेनुसार उद्या, म्हणजेच (12 जुलै) रोजी सकाळी 5:30 वाजता खेळला जाईल. हा सामना अमेरिकेतील डॅलस येथील ग्रँड प्रायरी स्टेडियममध्ये होईल. (CSK vs MI)
एमआयच्या संघाला या हंगामात सुपर किंग्जला एकदाही हरवता आलेले नाही. या हंगामात दोन्ही संघांमध्ये 2 सामने झाले आहेत. पहिल्या सामन्यात सुपर किंग्जने एमआयला 3 धावांनी पराभूत केले होते, तर दुसऱ्या सामन्यात सुपर किंग्जने एमआयला 39 धावांच्या मोठ्या फरकाने हरवले होते. सुपर किंग्ज ‘चॅलेंजर’ सामन्यात या हंगामात सलग तिसऱ्यांदा एमआयला हरवून फायनलमध्ये पोहोचण्याचा विचार करेल. दुसरीकडे, एमआयचा संघ मागील दोन्ही पराभव विसरून सुपर किंग्जला ‘चॅलेंजर’मध्ये मात देऊन फायनलमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल.
सुपर किंग्ज आणि एमआय संघातून जो कोणी ‘चॅलेंजर’ सामना जिंकेल, फायनलमध्ये त्याचा सामना या हंगामातील गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या वॉशिंग्टन फ्रीडमशी होईल. वॉशिंग्टनला क्वालिफायर-1 मध्ये गुणतालिकेत अव्वल राहिल्याचा फायदा मिळाला. वॉशिंग्टन आणि सुपर किंग्ज यांच्यातील क्वालिफायर-1 सामना पावसामुळे रद्द झाला होता, त्यानंतर गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असल्याने वॉशिंग्टन संघाला थेट फायनलचे तिकीट मिळाले. (MLC Final)






