आयपीएल २०२०मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना युवा प्रतिभावान खेळाडू ऋतुराज गायकवाडने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याचे अनेक दिग्गजांनी कौतुक केले आहे. आता चेन्नई संघाचे सर्वेसर्वा म्हणजे संघमालक एन श्रीनिवासन यांनी देखील ऋतुराजचे कौतुक केले आहे.
ऋतुराजसाठी या आयपीएल हंगामाची सुरुवात खास झाली नव्हती. तो दोनवेळा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याला अन्य खेळाडूंपेक्षा अधिक काळ क्वारंटाईनमध्ये रहावे लागले होते. ज्यामुळे तो आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर संघाशी जोडला गेला होता. त्यामुळे त्याला सुरुवातीला सरावासाठी फारसा वेळ मिळाला नाही. त्याची सुरुवातीच्या सामन्यातील कामगिरीही निराशाजनक राहिली. मात्र त्यानंतर त्याने जोरदार पुनरागमन करताना चेन्नईच्या शेवटच्या तीन विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
ऋतुराजमध्ये दिसते विराट कोहलीची झलक
त्यानंतर आता त्याचे श्रीनिवासन यांनी कौतुक केले आहे. त्यांनी मुंबई मिररशी बोलताना म्हटले की ‘ऋतुराजला कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर त्यातून बाहेर यायला थोडा उशीर झाला. फाफ डू प्लेसिसने म्हटल्याप्रमाणे त्याच्यात विराट कोहलीची झलक दिसते. त्याची फलंदाजी पाहा, खुप दिवसांनंतर आपल्याला असा गुणवान फलंदाज खेळताना दिसत आहे.’
फाफ डू प्लेसिसने मागील आठवड्यात ऋतुराजचे कौतुक करताना त्याला ‘युवा विराट कोहली’, असे म्हटले होते.
याबरोबरच श्रीनिवासन यांनी चेन्नई सुपर किंग्ज संघ पुढीलवर्षी जोरदार पुनरागमन करेल, असा विश्वास देखील यावेळी व्यक्त केला आहे.
चेन्नईला यंदा १४ पैकी केवळ ६ सामनेच जिंकता आले. परिणामी त्यांना आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच प्लेऑफ न खेळता बाहेर पडावे लागले.
ऋतुराजची आयपीएलमध्ये शानदार कामगिरी –
आयपीएल २०२० मध्ये सुरुवातीला अडखळलेला ऋतुराज गायकवाड नंतर चांगल्या फॉर्ममध्ये परतला. त्याने चेन्नईकडून शेवटच्या तीन सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे तो आयपीएलमध्ये सलग ३ अर्धशतके करणारा चेन्नईचा पहिला खेळाडू ठरला. त्याने आयपीेलमध्ये ६ सामन्यात ५१ च्या सरासरीने २०४ धावा केल्या. त्याचे या आयपीएल दरम्यान चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीनेही कौतुक केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-चेन्नईकडून दमदार कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायवाडबरोबर ‘या’ मोठ्या कंपनीने केला करार
–ऑस्ट्रेलियाला जाण्याआधी कोहलीचे मोठे भाष्य, ‘या’ कारणामुळे दौरे मोठे नसावेत