कोविड-१९ दरम्यान आज (१८ फेब्रुवारी) चेन्नईच्या ग्रँड चोला या पंचतारांकित हॉटेलमध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामाचा लिलाव पार पडणार आहे. तत्पुर्वी आयपीएल फ्रँचायझींचे मालक, प्रशिक्षक आणि व्यवस्थापक चेन्नईत पोहोचले आहेत. परंतु आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघांमध्ये गणला जाणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी यंदाच्या लिलावात हजर राहणार नाही.
यंदाचा लिलाव सीएसकेच्या घरेलू शहरातच होणार असल्याने धोनी प्रत्यक्षात लिलावात हजर राहणार असल्याची चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी या गोष्टीची पुष्टी केली असून धोनीबरोबर मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग देखील लिलावाचा भाग नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सीएसकेची जुनी परंपरा मोडणार
तसे पाहायचे झाले तर, धोनी आजवर एकदाही लिलावात प्रत्यक्ष सहभागी झालेला दिसला नाही. परंतु सीएसकेचे प्रशिक्षक फ्लेमिंग यांच्या गैरहजेरीमुळे संघाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. फ्लेमिंग २००९ पासून प्रत्येक लिलावात सहभागी झाले आहेत. परंतु यावेळी कोविड-१९ मुळे लावण्यात आलेल्या कठोर नियमांमुळे त्यांनी लिलावासाठी न येण्याचा निर्णय घेतला आहे.
विश्वनाथ यांनी यासंदर्भात इनसाइड स्पोर्टसशी बोलताना सांगितले की, “फ्लेमिंग आणि धोनी आयपीएल लिलावासाठी चेन्नईत येणार नाहीत. परंतु लिलावावेळी ते आमच्या संपर्कात राहतील.”
दिल्ली कॅपिटल्सचीही सारखीच परिस्थिती
दुसरीकडे आयपीएल २०२० चा उपविजेता संघ अर्थातच दिल्ली कॅपिटल्सलाही मोठा फटका बसला आहे. त्यांचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि कर्णधार श्रेयस अय्यर हेदेखील लिलावासाठी चेन्नईला येमार नाहीत. मात्र सहयोगी प्रशिक्षक मोहम्मद कैफ आणि प्रविण आमरे लिलावाच्या टेबलभोवती बसल्याचे दिसून येतील.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूची आयपीएल लिलावातून माघार, रोहितच्या संघाने ओतला असता बक्कळ पैसा!
आयपीएलच्या सर्व फ्रँयाचझींची यादी, पाहा कोणता खेळाडू आहे कोणत्या संघात
आयपीएलच्या सर्व संघमालकांची यादी; चेन्नईच्या मालकाचे नाव ऐकून थक्क व्हाल…