इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामाचा अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) दुबई येथे खेळला जाईल. या अंतिम सामन्यात एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स व ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स आमने-सामने येतील. या ‘मेगा फायनल’ सामन्यात अनेक खेळाडूंवर चाहत्यांची नजर असेल. या सामन्यात चेन्नईला आपले चौथे विजेतेपद मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकणाऱ्या पाच खेळाडूंविषयी आपण जाणून घेणार आहोत.
१) ऋतुराज गायकवाड
संपूर्ण हंगामात आपल्या फलंदाजीने चाहत्यांना अक्षरशः वेडावून टाकणाऱ्या सलामीवीर ऋतुराज गायकवाड याच्याकडून चेन्नईला या अंतिम सामन्यात मोठ्या अपेक्षा असतील. ऋतुराजने चेन्नईसाठी या हंगामात आतापर्यंत १५ सामन्यांमध्ये ६०३ धावा केल्या आहेत. जर त्याने अंतिम सामन्यात २४ धावा केल्या तर तो या हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करेल आणि ऑरेंज कॅप जिंकेल. त्यामुळे, त्याला रोखण्याचे मोठे आव्हान कोलकाताच्या गोलंदाजांसमोर असेल.
२) शार्दुल ठाकूर
नुकतीच टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झालेला अष्टपैलू शार्दुल ठाकूर या अंतिम सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्याने चालू हंगामात आतापर्यंत १८ बळी घेऊन चेन्नईच्या प्रवासात अतिशय मोठा वाटा उचलला आहे. त्याच्या अष्टपैलू गुणवत्तेमुळे तो कोलकातासाठी धोकादायक ठरू शकतो.
३) फाफ डू प्लेसिस
अनुभवी सलामीवीर फाफ डू प्लेसिस हा या हंगामात संघासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. आतापर्यंत त्याने १५ सामन्यांमध्ये ५४७ धावा केल्या आहेत. संघाला अंतिम फेरीत नेण्यातही त्याने मोलाची कामगिरी बजावली आहे. आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत प्लेसिस सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने आणखी एक शानदार खेळी केल्यास तो चेन्नईला चौथे विजेतेपद मिळवून देऊ शकतो.
४) रवींद्र जडेजा
भारतीय संघाचा व चेन्नईचा सर्वात अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा हादेखील या अंतिम सामन्यात आपली चमक दाखवू शकतो. त्याने आतापर्यंत १५ सामने खेळताना २२७ धावा व ११ बळी मिळवत संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. तसेच, क्षेत्ररक्षणात तो सहज काही धावांचा बचाव करून संघाच्या विजयात हातभार लावू शकतो.
५) जोस हेजलवूड-
संपूर्ण आयपीएल हंगामामध्ये चेन्नईसाठी पडद्यामागील सुत्रधार म्हणून वेगवान गोलंदाज जोस हेजलवूडने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने सातत्याने किफायतशीर गोलंदाजी करताना संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने, ८ सामन्यांमध्ये ९ बळी मिळवताना मोक्याच्या क्षणी विरोधी संघांना हादरे दिले आहेत. अंतिम सामन्यात दुबईच्या खेळपट्टीवर तो संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये अंतिम सामन्यात सर्वाधिक वेळा पोहचणारे संघ; चेन्नई अव्वल क्रमांकावर, तर मुंबई…
नेहमी धोनीला कोसणाऱ्या गंभीरचे बदलले सूर, आयपीएल फायनलपूर्वी उधळली स्तुतीसुमने; पाहा काय म्हणाला?
सीएसके आणि आयपीएल जेतेपदाच्या आड येऊ शकतात केकेआरचे फॉर्मात असलेले ‘हे’ ४ शिलेदार






