आयपीएल 2025 स्पर्धेदरम्यान चेन्नई संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड कोपराच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. गायकवाडच्या जागी धोनीने चेन्नईचे कर्णधारपद स्वीकारले आहे. त्यादरम्यान आता,17 वर्षीय स्फोटक सलामीवीर फलंदाजाला चेन्नई सुपर किंग्स संघात ऋतुराज गायकवाडच्या जागी स्थान देण्यात आले आहे. पण हा नवा खेळाडू आयुष म्हात्रे कोण आहे, जाणून घेऊया.
चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2025 च्या उर्वरित हंगामातील सामन्यांसाठी मुंबई क्रिकेट संघाच्या17 वर्षीय खेळाडूला संघात स्थान दिल आहे. त्याने ऋतुराज स्पर्धेबाहेर झाल्यानंतर ट्रायल दिले होते, त्यानंतर त्याची संघात निवड करण्यात आली आहे. चेन्नईच्या लखनऊविरूद्ध सामन्यानंतर संघाने आयुष म्हात्रेला संघात सामील केल्याची घोषणा केली आहे.
आयुष म्हात्रेला ट्रायल्ससाठी बोलावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने त्याची निवड केली. गुरुवार,10 एप्रिल रोजी ऋतुराज गायकवाड स्पर्धेतून बाहेर झाला आणि दुसऱ्या दिवशी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या घरेलु सामन्यात त्याच्या अनुपस्थितीत एमएस धोनीने संघाचे नेतृत्व केले. शनिवारी ऋतुराज गायकवाडच्या जागी आयुष म्हात्रेला संघात आणण्याचा निर्णय चेन्नई सुपर किंग्जने घेतला.
आयुष म्हात्रे मूळ मुंबईचा राहणारा आहे. त्याचे सध्या वय 17 वर्ष 272 दिवस आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी करतो, तसेच उजव्या हातानेच ऑफ-ब्रेक गोलंदाजी सुद्धा करतो. याचबरोबर मुंबई क्रिकेट संघाकडून तो देशांतर्गत क्रिकेट देखील खेळतो.
आयुष म्हात्रेने आतापर्यंत त्याने 9 प्रथम श्रेणी तसेच 7 लिस्ट ए सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. आयुषने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या 16 डावांमध्ये 31.50 च्या सरासरीने 504 धावा केल्या आहेत, तर लिस्ट ए क्रिकेटच्या 7 डावांमध्ये 65.42 च्या सरासरीने 458 धावा केल्या आहेत. आयुष केवळ फलंदाजीच करण्यात नाही तर गोलंदाजी करण्यासाठी सुद्धा माहिर आहे. त्याला आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विकेट मिळवता आलेली नाही. पण 4 लिस्ट ए डावांमध्ये त्याने 11.28 च्या सरासरीने 7 विकेट्स घेतल्या आहेत.