मुंबई। आयपीएल २०१८ ला आज सुरुवात झाली आहे. आज वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सलामीचा सामना सुरु आहे. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघासमोर १६६ धावांचे आव्हान ठेवले आहे.
आज सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला अचूक ठरवत चेन्नईच्या गोलंदाजांनी सलामीवीर एल्विन लेविस(०) आणि कर्णधार रोहित शर्माला(१५) लवकर बाद करून चांगली सुरुवात करून दिली.
मात्र मुंबईचा डाव या दोन विकेट्स नंतर ईशान किशन आणि सूर्यकुमार यादवने सांभाळला. या दोघांनी मिळून ७८ धावांची भक्कम भागीदारी रचली. आक्रमक खेळणाऱ्या जोडीला चेन्नईच्या शेन वॉटसनने तोडले. त्याने सूर्यकुमारला २९ चेंडूत ४३ धावांवर असताना बाद केले.
त्यानंतर लगेचच किशनही २९ चेंडूत ४० धावा करून बाद झाला. त्यामुळे मुंबई इंडियन्सची अवस्था १४.४ षटकात ४ बाद ११३ अशी झाली. यानंतर पंड्या बंधूंनी चांगला खेळ केला. या दोघांच्याही आक्रमणामुळे मुंबईला २० षटकात ४ बाद १६५ धावा करण्यात यश आले.
हार्दिकने आज कृणालची चांगली साथ देताना २० चेंडूत नाबाद २२ धावा केल्या, तर कृणालने अखेरच्या काही षटकात फटकेबाजी करताना २२ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या.
चेन्नईकडून शेन वॉटसन(२/२९), दीपक चहर(१/१४) आणि इम्रान ताहीर(१/२३) यांनी विकेट्स घेतल्या.