आयपीएल 2024 च्या 18 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने आहेत. हैदराबादमध्ये खेळल्या जात असलेल्या या सामन्यात सनरायझर्सचा कर्णधार पॅट कमिन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्जच्या प्लेइंग 11 मध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
वेगवान गोलंदाज माथिशा पाथिराना आजचा सामना खेळत नाहीये. नाणेफेकीदरम्यान सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं सांगितलं की, त्याला दुखापत झाली आहे. दुसरीकडे, संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानही व्हिसाच्या कामासाठी बांगलादेशला गेला आहे. अशा स्थितीत त्याला पुढील काही सामन्यांना मुकावं लागू शकतं.
याचाच अर्थ, चेन्नई सुपर किंग्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात आपल्या दोन प्रमुख गोलंदाजांशिवाय उतरला आहे. ऋतुराजनं सांगितलं की, पाथीराणाला निगल आहे. अशा स्थितीत तो आज विश्रांती घेतोय. पाथिरानाची दुखापती किती गंभीर आहे याबद्दल कोणतंही अपडेट नाही.
पाथिराना जर दुखापतीमुळे आगामी सामनेही मुकला तर चेन्नईला त्याची उणीव नक्कीच भासेल. डेथ ओव्हर्समध्ये तो संघाचं प्रमुख अस्त्र आहे. दुसरीकडे, आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेणारा मुस्तफिजुर रहमानही बांगलादेशला परतला आहे. वृत्तांनुसार, तो अमेरिकेत होणाऱ्या आगामी टी 20 विश्वचषकासाठी व्हिसाच्या कामासाठी बांगलादेशला परतलाय. अशा स्थितीत तो एकापेक्षा जास्त सामन्यांना मुकू शकतो. त्यानं आयपीएल 2024 मध्ये 3 सामन्यात एकूण 7 विकेट घेतल्या आहेत. मुस्तफिजूर रहमानची अनुपस्थिती आणि पाथिरानाची दुखापत यामुळे सीएसकेच्या अडचणी वाढल्या आहेत.
पाथिरानानं या हंगामात खेळलेल्या 2 सामन्यात 4 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमधील त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्यानं आतापर्यंत खेळलेल्या 16 सामन्यांमध्ये 25 बळी घेतले आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 19.32 आणि इकॉनॉमी 7.90 एवढी राहिली. 15 धावा देऊन 3 बळी ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणींमध्ये वाढ; कुलदीप यादवची दुखापत गंभीर, डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला
सलग तीन पराभवानंतर हार्दिक पांड्या महादेवाच्या चरणी, सोमनाथ मंदिरात केली पूजा