रविवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात मोठा ड्रामा झाला. चेन्नईच्या फलंदाजीदरम्यान, रवींद्र जडेजाला डावाच्या 16व्या षटकात मैदानात अडथळा आणल्याबद्दल बाद घोषित करण्यात आलं. जडेजा अंपायरच्या या निर्णयानं अजिबात खूश नव्हता. पॅव्हेलियनमध्ये परत जाताना तो खूप नाराज दिसत होता.
वास्तविक, रवींद्र जडेजानं आवेश खानविरुद्ध ऑफ साइडमध्ये हलका शॉट खेळला. त्यानं ऋतुराज गायकवाडसोबत एक धाव पटकन पूर्ण केली. परंतु दुसरा रन घेण्यासाठी जेव्हा तो धावला, तेव्हा ऋतुराजनं त्याला माघारी पाठवलं. जडेजा माघारी फिरला मात्र त्यानं अर्धी खेळपट्टी गाठली तोपर्यंत चेंडू संजू सॅमसनपर्यंत पोहोचला होता. सॅमसननं नॉन-स्ट्राइक एंडला लक्ष्य करत थ्रो केला, मात्र जडेजा मध्ये आला. तो विकेट्समधून क्रिझपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. संजूचा थ्रो जडेजाच्या हाताला लागला. अशा स्थितीत मैदानावरील पंचांनी प्रकरण तिसऱ्या अंपायरकडे पाठवलं. तिसऱ्या अंपायरनं जडेजाला मैदानात अडथळा आणल्याबद्दल बाद घोषित केलं.
क्रिकेटमध्ये मैदानात अडथळा आणण्याचा नियम काय आहे?
क्रिकेटमध्ये मैदानात अडथळा आणण्याविरोधात एक नियम आहे. या नियमानुसार कोणत्याही खेळाडूनं क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्यास त्याच्यावर कारवाई केली जाते. क्रिकेटचा नियम 37.1.1 सांगतो की, चेंडू खेळल्यानंतर जर फलंदाज जाणूनबुजून विरोधी क्षेत्ररक्षकांच्या कामात अडथळा आणतो किंवा त्याच्या बोलण्यानं किंवा कृतीनं क्षेत्ररक्षकांचं लक्ष विचलित करतो, तेव्हा तो फलंदाज मैदानात अडथळा आणण्यासाठी दोषी मानला जातो.
आयपीएलमध्ये एखाद्या खेळाडूनं मैदानात अडथळा आणण्याची ही पहिलीच वेळ नाही. जडेजाच्या आधी युसूफ पठाण 2013 मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध अशाच पद्धतीनं बाद झाला होता. तर अमित मिश्राही 2019 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अशाच पद्धतीनं बाद झाला आहे.
राजस्थानविरुद्धच्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं 5 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं प्रथम फलंदाजी करताना 141 धावा केल्या. प्रत्युत्तरात, सीएसकेनं 8 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
चेपॉकच्या संथ खेळपट्टीवर ऋतुराज गायकवाडची कमाल, चेन्नईचा राजस्थानवर शानदार विजय
संजू सॅमसनच्या नावे आणखी एक विक्रम, आयपीएलमध्ये मोडला स्वत:चा रेकॉर्ड