हार्दिक पांड्या चेन्नई सुपर किंग्समध्ये जाण्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. काही आठवड्यांपूर्वी CSK चे सीईओ काशी विश्वनाथन यांनी हार्दिकला मुंबई इंडियन्सकडून ट्रेड (ट्रेडिंगद्वारे संघात समाविष्ट) करण्याच्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. मात्र, आता ‘हिंदुस्तान टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, चेन्नई सुपर किंग्स हार्दिकला आपल्या संघात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.
हिंदुस्तान टाइम्सनुसार, मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याच्या बदल्यात शिवम दुबे आणि आयुष म्हात्रे यांची मागणी केली होती. मुंबई संघाचे व्यवस्थापन म्हात्रे यांच्याकडे भविष्यातील स्टार खेळाडू म्हणून पाहत आहे, परंतु चेन्नई सुपर किंग्स आपल्या या 19 वर्षांच्या स्टार सलामीवीर खेळाडूला सोडण्यास तयार नाही.
चेन्नई सुपर किंग्सने MI समोर एक ‘काउंटर ऑफर’ (प्रतिप्रस्ताव) ठेवला आहे. सीएसके शिवम दुबेला सोडण्यास तयार आहे, पण आयुष म्हात्रेच्या ऐवजी त्यांनी डेवाल्ड ब्रेव्हिसला मुंबईकडे पाठवण्याचा प्रस्ताव दिला आहे. एवढेच नाही तर CSK चा संघ हार्दिक पांड्यासाठी शिवम दुबे, डेवाल्ड ब्रेव्हिस आणि त्यासोबत अतिरिक्त 10 कोटी रुपये देण्यासही तयार आहे. जर दोन्ही फ्रँचायझींमध्ये यावर सहमती झाली, तर ही एकूण 20 कोटी रुपयांपेक्षाही मोठी डील (व्यवहार) ठरेल.
भारतीय क्रिकेटमध्ये असे ऑलराउंडर (अष्टपैलू खेळाडू) फार कमी झाले आहेत, जे मधल्या फळीत फलंदाजी करू शकतात आणि ज्यांच्याकडे नेतृत्व कौशल्यही उत्तम आहे. जरी हार्दिकच्या कर्णधारपदाखाली मुंबई इंडियन्सला गेल्या 3 हंगामात विजेतेपद मिळवता आले नसले, तरी त्यांच्याच नेतृत्वाखाली गुजरातने 2022 चे आयपीएल विजेतेपद जिंकले होते.
हार्दिक पांड्यावर कोणतीही टीम कोट्यवधी रुपये उधळायला तयार होईल, कारण ते टी-20 सामन्यांमध्ये 4 षटके गोलंदाजी करू शकतात, मधल्या फळीत फक्त फलंदाजीच नाही तर फिनिशरची भूमिकाही बजावू शकतात. यासोबतच ते कर्णधारपदही सांभाळू शकतात.





