फिरकीपटू रवींद्र जडेजा व पियुष चावला यांच्या आयपीएलमधील आतापर्यंतच्या कामगिरीवर प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंगंनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच येणाऱ्या ७ दिवसांत कमजोर बाजूंवर काम करणार असल्याचे वक्तव्य केले आहे.
रवींद्र जडेजाने २०२० आयपीएल स्पर्धेत अवघ्या दोन विकेट्स घेतल्या आहेत. गेल्या दोन सामन्यात तो खूपच महाग ठरला आहे. राजस्थान रॉयल्स (आरआर) आणि दिल्ली कॅपिटल्स (डीसी) विरुद्धच्या सामन्यांमध्ये त्याने 4 षटकांत 40 पेक्षा जास्त धावा दिल्या.
य़ाचपार्श्वभूमीवर चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) चे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगंनी दिल्ली कॅपिटल्स(डीसी) विरुद्ध-44 धावांनी पराभव झाल्यावर नाराजी व्यक्त केली. तसेच फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा आणि पियुष चावला यांचा फॉर्म चिंताजनक असल्याचे भाष्य केले.
दुसरीकडे, पियुष चावलाने आतापर्यंत या स्पर्धेत 4 विकेट्स घेतल्या, परंतु राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात या फिरकी गोलंदाजीने 4 षटकांत 55 धावा दिल्या होत्या तर दिल्लीविरुद्धच्या सामन्यात 33 धावा दिल्या.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना फ्लेमिंग म्हणाले की, ”होय ही चिंताजनक बाब आहे. सध्या फिरकी विभाग चांगली कामगिरी करत नाही. आम्ही गेल्या बारा वर्षात विकसित केलेल्या खेळाच्या विभागापैकी फिरकी विभाग सीएसकेची मजबूत बाजू आहे. परंतू आता हीच गोष्ट चिंतेची बाब ठरत आहे.”
“आम्ही तीन वेगवेगळ्या मैदानांवर खेळलो आहोत आणि तिनही ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थिती निर्माण झाल्या आहेत. आम्ही गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी केली नाही, त्यामुळे आम्हाला त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे,” असे फ्लेमिंग पुढे म्हणाले.
दिल्लीविरुद्ध सीएसके 176 चे लक्ष्य पार करु शकला नाही. संघ 44 धावांनी पराभूत झाला. संघाचा कर्णधार धोनी सलग दुसऱ्या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्यावेळी संघाची धावसंख्या 16 षटकांत 4 गडी गमावून 98 धावा होती.
सीएसकेच्या फलंदाजीबाबत फ्लेमिंग म्हणाले की, “याक्षणी आम्ही थोडे चिंताग्रस्त आहोत, आम्हाला काही महत्त्वाच्या खेळाडूंची कमतरता जाणवत आहेत. आम्ही संतुलीत कामगिरीची व संघाची अपेक्षा करत आहोत. आम्ही रैना आणि रायुडूशिवाय खेळण्याचा प्रयत्न करीत आहोत. दिल्लीविरुद्धची कामगिरी खराब होती. हे सहा दिवस संघासाठी कठीण राहिले आहेत. आता उणीव दूर करण्याची वेळ आली आहे.”
चेन्नई संघाने यावर्षी आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक सामने खेळले आहेत. परंतू यातील तीनपैकी दोन सामने त्यांनी गमावले आहेत. पुढील सामना 2 ऑक्टोबरला सनराइजर्स हैदराबाद (एसआरएच) विरुद्ध होणार आहे. संघाला आपल्या कमकुवत बाजूंवर काम करण्यासाठी 7 दिवस मिळणार आहेत.