मुंबई । आयपीएलच्या 13 व्या हंगामाचा 7 वा सामना शुक्रवारी दुबईमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि दिल्ली कॅपिटल्स (डीसी) यांच्यात खेळला जाईल. या हंगामातील हा चेन्नईचा तिसरा सामना आहे, तर दिल्लीसाठी हा दुसरा सामना आहे. दिल्लीविरुद्ध चेन्नई संघ नेहमीच वरचढ ठरला आहे. चेन्नईने गेल्या 5 सामन्यात 4 सामने जिंकले आहेत. मागील दोन हंगामादरम्यान झालेल्या 3 सामन्यात चेन्नईने दिल्लीचा सर्व पराभव केला. दोन्ही संघ प्रथमच दुबई शहरात खेळणार आहेत.
धोनीला करावा लागतोय टीकेचा सामना
राजस्थानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात धोनीने 7 व्या क्रमांकावर फलंदाजी केली. धोनीपूर्वी सॅम करन, रवींद्र जडेजा आणि केदार जाधव यांना फलंदाजीसाठी पाठवले गेले. सामन्यात चेन्नईचा 16 धावांनी पराभव झाला. यानंतर फलंदाजीच्या क्रमवारीबद्दल धोनीला टीकेचा सामना करावा लागला.
रायुडू आणि ब्राव्होच्या आजच्या सामन्यात खेळण्यावर प्रश्नचिन्ह
अंबाती रायुडू आणि ड्वेन ब्राव्हो यांच्या आजच्या सामन्यात खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हॅम स्ट्रिंगच्या समस्येमुळे रायडू राजस्थानविरुद्धचा सामना खेळू शकला नव्हता. या हंगामाच्या सुरुवातीला ब्राव्हो दोन्ही सामन्यात खेळला नव्हता. अशा परिस्थितीत दिल्लीविरुद्धच्या सामन्यात या दोन खेळाडूंच्या सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
चाहत्यांची धोनीच्या या विक्रमावर असेल नजर
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा दुसरा फलंदाज होण्यासाठी धोनीला केवळ ३ षटकारांची गरज आहे. धोनीने आयपीएलमध्ये २१२ षटकार मारले आहे. सध्या दुसऱ्या स्थानावर एबी डिविलियर्स असून त्याने २१५ षटकार मारले आहे तर ख्रिस गेलने ३१२ षटकार आयपीएल कारकिर्दीत मारले आहे.
100 षटकार पूर्ण करण्यासाठी शिखर धवनला 4, तर रीषभ पंतला 6 षटकारांची आवश्यकता आहे.
दोन्ही संघांचे महागडे खेळाडू
कर्णधार धोनी हा सीएसकेचा सर्वात महागडा खेळाडू आहे. चेन्नईने त्याला या हंगामात 15 कोटी रुपये मोजले आहेत. त्यांच्यापाठोपाठ केदार जाधव सर्वात महागडा खेळाडू असून त्याला 7.80 कोटी रुपये लिलावात बोली लागली आहे. त्याचबरोबर, रीषभ पंत हा दिल्लीचा सर्वात महागडा खेळाडू असून त्याला लिलावात 15 कोटी तर शिमरॉन हेटमायरची किंमत 7.75 कोटी मोजले आहेत.
दिल्ली विरुद्ध चेन्नई इतिहास
आयपीएलमध्ये चेन्नई विरुद्ध दिल्ली सामन्यांत धोनीचा संघ वरचढ राहिला आहे. आतापर्यंत या दोन संघात 21 सामने झाले आहेत. यात चेन्नईने 15 आणि दिल्लीने 6 सामने जिंकले आहेत. मागील हंगामात दिल्लीला चेन्नईचा एकदाही पराभव करता आला नाही.
युएईमध्ये दिल्लीचा विक्रम खराब तर चेन्नई 5 पैकी 4 सामन्यात विजयी
लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल 2009चे आयोजन दक्षिण आफ्रिकेत आणि 2014 च्या हंगामाचे पहिले 20 सामने युएईमध्ये घेण्यात आले होते. त्यावेळी युएईमधील दिल्लीची कामगिरी खूप खराब राहिली होती. आतापर्यंत दिल्ली संघाने येथे ५ पैकी २ सामने जिंकले होते तर चेन्नईने ५ पैकी ४ सामने जिंकले आहेत.
दिल्लीने पंजाबचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला
या हंगामात दिल्लीने आपला यापुर्वीचा सामना पंजाबविरुद्ध दुबईमध्ये खेळला. ज्याचा निर्णय सुपर ओव्हरमध्ये झाला. सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने पंजाबला केवळ तीन धावांवर रोखले होते.
खेळपट्टी आणि हवामान अहवाल
दुबईतील सामन्यादरम्यान आकाश स्वच्छ राहिल. तापमान 27 ते 39 डिग्री सेल्सियस दरम्यान राहिलं. येथील खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकते. येथे स्लो विकेट असल्याने फिरकीपटूनाही खूप मदत होईल. नाणेफेक जिंकणार्या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल. या आयपीएलपूर्वी, शेवटच्या 61 टी -20 सामन्यात प्रथम फलंदाजी करणार्या संघाचा विजयाची टक्केवारी 55.74% राहिली आहे.
या मैदानावर एकूण टी 20 सामने : 61
प्रथम फलंदाजीचा करणारा संघ जिंकला: 34 वेळा
प्रथम गोलंदाजी करणारा संघ जिंकला: 26 वेळा
पहिल्या डावात सरासरी संघाची धावसंख्या: 144
दुसर्या डावात टीमची सरासरी धावसंख्या: 122
आयपीएलमध्ये फायनल न खेळलेला संघ
दिल्ली कॅपिटल्स हा आयपीएलमधील एकमेव असा संघ आहे जो आतापर्यंत अंतिम सामना खेळू शकला नाही. तथापि, दिल्लीने स्पर्धेच्या पहिल्या दोन हंगामात (2008, 2009) उपांत्य फेरी गाठली होती. दिल्ली कॅपिटल्समध्ये युवा खेळाडूंवर संघाला जिंकून देण्याची जबाबदारी असेल. कर्णधार श्रेयस अय्यर, रीषभ पंत आणि पृथ्वी शॉ हे तरूण फलंदाज संघातील महत्त्वाचे खेळाडू आहेत.