दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ५३ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात गुरुवारी (७ ऑक्टोबर) झाला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने ६ विकेट्सने विजय मिळवला. यासह त्यांचे प्लेऑफमधील जाण्याच्या आशाही जिवंत राहिल्या आहेत. पंजाबकडून कर्णधार केएल राहुलने नाबाद ९८ धावांची खेळी केली.
या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १३४ धावा केल्या. तसेच पंजाबला विजयासाठी १३५ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने १३ षटकात ४ विकेट्स गमावत १३९ धावा करत सामना जिंकला.
पंजाबकडून १३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीला केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांची जोडी उतरली. या दोघांनी चांगली सुरुवात केली होती. पण, शार्दुल ठाकूरने ५ व्या षटकात पंजाबला दुहेरी धक्का दिला. त्याने अगरवालला १२ धावांवर बाद केले. तर सर्फराजला शुन्यावर बाद केले.
त्यानंतर शाहरुख खानने केएल राहुलला साथ देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला दीपक चाहरने ९ व्या षटकात माघारी धाडले. त्याने ८ धावा केल्या. दरम्यान, केएल राहुलने आक्रमक खेळताना आयपीएलमधील त्याचे २७ वे अर्धशतक केले. याबरोबरच तो पंजाबकडून सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज ठरला.
केएल राहुलला साथ देत असलेला एडेन मार्करम देखील १३ व्या षटकात १३ धावांवर बाद झाला. पण, केएल राहुलने तुफानी खेळ करत पंजाबच्या विजयावर १३ षटकांत शिक्कामोर्तब केले. त्याने ४२ चेंडूत नाबाद ९८ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ७ चौकार आणि ८ षटकार मारले.
चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर दीपक चाहरने १ विकेट घेतली.
डू प्लेसिसने झुंजार अर्धशतक
या सामन्यात पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिसने सुरुवात केली. पण ही जोडी फार काळ टिकली नाही. चौथ्या षटकात ऋतुराजला अर्शदीप सिंगने १२ धावांवर बाद केले. पाठोपाठ ६ व्या षटकात मोईन अली शुन्यावर अर्शदीपच्याच गोलंदाजीवर बाद झाला.
तर, ७ व्या षटकात ख्रिस जॉर्डनने रॉबिन उथप्पाला २ धावांवर, तर ९ व्या षटकात अंबाती रायडूला ४ धावांवर माघारी धाडले. त्यानंतर कर्णधार एमएस धोनीही फार काळ टिकला नाही. तो १५ चेंडूच २ चौकारांसह १२ धावा करुन बाद झाला. त्या १२ व्या षटकात रवी बिश्नोईने त्रिफळाचीत केले. असे असले तरी एका बाजूने फाफ डू प्लेसिसने डाव सांभाळला. त्याने त्याचे वैयक्तिक अर्धशतकही पूर्ण केले.
फाफ डू प्लेसिसला अखेरच्या काही षटकांसाठी रविंद्र जडेजाने साथ दिली. पण २० व्या षटकात डू प्लेसिसला मोहम्मद शमीने यष्टीरक्षक केएल राहुल करवी झेलबाद केले. डू प्लेसिसने ५५ चेंडूत ७६ धावा केल्या. या खेळीत त्याने ८ चौकार आणि २ षटकार मारले. अखेर ड्वेन ब्रावो आणि रविंद्र जडेजाने चेन्नईला २० षटकात १३४ धावांपर्यंत पोहचवले. रविंद्र जडेजा १५ धावांवर नाबाद राहिला. तर, ब्रावो ४ धावांवर नाबाद राहिला.
पंजाबकडून अर्शदीप सिंग आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच रवी बिश्नोई आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी १ विकेट घेतली.
असे आहेत ११ जणांचे संघ –
चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, जोश हेजलवुड
पंजाब किंग्ज: केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), मयंक अगरवाल, एडन मार्करम, सरफराज खान, शाहरुख खान, मोझेस हेन्रिक्स, ख्रिस जॉर्डन, हरप्रीत ब्रार, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग